अकोला : महागडे शौक पूर्ण करण्यासाठी २२ वर्षीय तरुणीने नामांकित ज्वेलर्समध्ये लाखो रुपयांच्या दोन चेनची चोरी केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सिव्हिल लाईन पोलिसांनी तत्काळ तपास करून तरुणीला सहा तासांत गजाआड केले. ईशा सत्यप्रकाश पांडे (२२ वर्षे, रा. कैलास टेकडी, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून एक तरुणी दाखल झाली. चेहऱ्यावर स्कार्फ बांधून तिने स्वतःची ओळख लपवली.

सेल्समन प्रवीण वडजे यांच्याकडे सोन्याची चेन घेण्याचा बहाणा करून समोरील ट्रेमधून चार ग्रॅमची चेन ४२ हजार व २० ग्रॅमची दुसरी चेन दोन लाख सहा हजार ६२२ रुपये असा एकूण दोन लाख ४८ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या एका ज्वेलर्समध्ये देखील त्या तरुणीने चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी चेहऱ्यावरील स्कार्फ काढण्यास सांगितल्याने चोरीचा प्रत्यन फसला.

स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत सातव यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीवरून हा गुन्हा कैलास टेकडी येथे रहिवासी ईशा सत्यप्रकाश पांडे हिने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण तीन लाख १८ हजार ६२२ चा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुळकर्णी, पोलीस निरीक्षक जयंत सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही तासांत आरोपी तरुणी जेरबंद झाली आहे.

विशेष दक्षता घेण्याच्या सूचना

सराफा दुकानात स्कार्फ, मास्क व हेल्मेटने चेहरा झाकून येणाऱ्या ग्राहकांशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नये. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या वाहन क्रमांकाची नोंद ठेवण्याच्या सुरक्षारक्षकाला सूचना देण्यात याव्या, असे आवाहन अकोला पोलिसांनी शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांना केली आहे.