नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता विविध राजकीय पक्षांनी २७६ विमान आणि हेलिकॉप्टरद्वारे नागपूर गाठले. यातून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुमारे साडेआठ लाखांचे उत्पन मिळाले.

लोकसभेची निवडणूक विदर्भात पहिल्या दोन टप्प्यात झाली तर मराठवाड्यातील तीन मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. त्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमुळे नागपूर विमानतळावर गेले महिनाभर हेलिकॉप्टर, विमानांची वर्दळ वाढली. त्यातून नागपूर विमानतळाला ८ लाख ४९ हजार १७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती, आपचे खासदार संजय सिंह, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी विदर्भ, मराठवाड्याचा दौरा केला.

आणखी वाचा-राज्यात सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांची संख्या १.४० लाखावर

हे संबंधित पक्षाचे स्टार प्रचारक खासगी विमानाने (भाड्याने) नागपुरात आले आणि हेलिकॉप्टरने विदर्भ तसेच मराठवाड्यातील सभास्थळाकडे रवाना झाले. २४ मार्च ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत नागपूर विमानतळावर नियमित विमानांव्यतिरिक्त १२५ खासगी हेलिकॉप्टर आणि १५१ विमान आले. त्यातून नागपूर विमानतळ प्रशासनाला विमानाच्या लँडिगसाठी ७ लाख ९ हजार ९२३ रुपये आणि पार्किंग शुल्क ९१ हजार ४२४ रुपये मिळाले. हेलिकॉप्टरच्या लँडिगचे शुल्क ३३ हजार ९२० रुपये आणि पार्किंगचे शुल्क १३ हजार ९०८ प्राप्त झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निवडणूक काळात नियमित विमानांव्यतिरिक्त नागपूर विमानतळावर खासगी हेलिकॉप्टर आणि छोट्या आकाराच्या विमानांची वर्दळ वाढली होती. त्यातून विमानतळाच्या महसुलात वाढ झाली.” -मो. आबिद रुही, वरिष्ठ संचालक, नागपूर विमानतळ.