अमरावती: शैक्षणिक संस्‍थेतील मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्‍याच्‍या उद्देशाने संस्‍थेत तांत्रिक सोयी सुविधा आणि इमारत बांधकामासाठी उद्योगांच्‍या सामाजिक दायित्‍व निधीतून (सीएसआर) २५ कोटी रुपये मिळवून देण्‍याचे आमिष दाखवून तीन आरोपींनी शिक्षण संस्‍थाचालकाची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आल्‍याची घटना येथील कोतवाली पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत उघडकीस आली आहे.

अजाबराव भोंगाडे (५५), सचिन मुंडाने (५०), गणेश सोनवणे (५५, सर्व रा. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. येथील विजय केशवराव टोम्‍पे (४९, रा. अंबापेठ, अमरावती) यांनी कोतवाली पोलीस ठाण्‍यात दिलेल्‍या तक्रारीनुसार शिक्षण संस्‍थेतील विकास कामांसाठी सीएसआर निधी मिळवून देण्‍यासाठी आरोपींनी त्‍यांच्‍यासोबत संपर्क साधला.

हेही वाचा… डोळ्यांची साथ जोरात, आरोग्य यंत्रणा कोमात! औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्ण बेजार

२५ कोटी रुपयांचा निधी मिळवून देतो, असे आमिष दाखवून टोम्‍पे यांचा विश्‍वास संपादन केला. त्‍यानंतर गेल्‍या महिन्‍यात आरोपींनी सुरक्षा अनामत रक्‍कम म्‍हणून टोम्‍पे यांच्‍याकडून ३० लाख रुपये आरटीजीएस आणि रोख स्‍वरूपात घेतले. त्‍यानंतर आरोपींनी संस्‍थेच्‍या नावे दिलीप बिल्‍डकॉन लि. या कंपनीचा पंजाब नॅशनल बँकेचा धनादेश दिला. पण, जेव्‍हा टोम्‍पे यांनी हा धनादेश सादर केला, तेव्‍हा तो बनावट असल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर त्‍यांना धक्‍काच बसला.

हेही वाचा… अकोला: कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित यंत्रे उत्पन्न वाढीसह श्रम कमी करणार; सामंजस्य करारामुळे शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब नॅशनल बँकेचा धनादेश बनावट असल्‍याचे माहित असूनही संस्‍थेची आर्थिक फसवणूक करण्‍याच्‍या उद्देशाने आरोपींनी टोम्‍पे यांना धनादेश दिला. आरोपींनी टोम्‍पे यांना आजपर्यंत सीएसआर निधी मिळवून दिला नाही. टोम्‍पे यांनी दिलेल्‍या ३० लाख रुपयांच्‍या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्‍याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.