नागपूर : राज्यात पशुधनांमध्ये पसरत असलेली ‘लम्पी’ आजाराची साथ आटोक्यात आल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला तरी आतापर्यंत १९१६ जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी ४० टक्के मृत्यू विदर्भातील सात जिल्ह्यातील आहेत. राज्यात पशुधनांमध्ये हा आजार झपाटय़ाने पसरतो आहे. ३ ऑक्टोबपर्यंत ३१ जिल्ह्यांमधील २१५१ गावांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव दिसून आला असून.४९ हजार पशुधन यामुळे  बाधित झाले आहे. आतापर्यंत  एकूण १९१६ जनावरांचे मृत्यू झाले. ही सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. एकूण मृत जनावरांपैकी ७८६ जनावरे विदर्भातील आहेत. त्यात सर्वाधिक अकोला जिल्ह्यात (३०८) आहे. विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रात (६०४) मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या भागात दुग्ध व्यवसाय मोठय़ा प्रमाणात आहे हे येथे उल्लेखनीय.

दरम्यान, बाधित पशुधनापैकी निम्मे रोगमुक्त झाल्याचा दावा राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंह यांनी केला. विविध जिल्ह्यांमध्ये तीन तारखेपर्यंत १.०५ कोटी जनावरांचे लसीकरण केले जात आहे. अकोला, वाशीम जळगांव, कोल्हापूर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिकरित्या पशुपालकांमार्फत सुमारे ७५.४९ टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले, असा त्यांचा दावा आहे.

जिल्हानिहाय  एकूण मृत्यू (३ ऑक्टोबरपर्यंत)

अकोला (३०८), बुलढाणा (२७०), अमरावती (१६८), यवतमाळ (२), वाशीम (२८), वर्धा (२), नागपूर(५), पुणे (१२१), अहमदनगर (२०१), सातारा (१४४), कोल्हापूर(९७), सांगली (१९), सोलापूर (२२), जळगाव (३२६), धुळे (३०), लातूर (१९), औरंगाबाद (६०), बीड (६), उस्मानाबाद (६), जालना (१२), नांदेड (१७) हिंगोली (१), नंदुरबार (१५), पालघर (२), ठाणे (२४), नाशिक (७), रायगड (४).