नागपूर : आसाममधील ‘मानिकी’ नावाच्या ४८ वर्षाच्या हत्तीणीला वैद्यकीय उपचारासाठी तब्बल ९५ किलोमीटर चालण्यास भाग पाडण्यात आले. ही चित्रफित समाजमाध्यमावर सामाईक झाल्यानंतर आसाम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. दरम्यान, महाराष्ट्रातील हत्तींबाबत भूमिका घेणारी ‘पेटा’ ही संस्था आणि ‘वनतारा’ हे बचाव व पुनर्वसन केंद्र आसाममधील या प्रकरणावर गप्प आहे. त्यामुळे त्यांच्या या मूक भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘मानिकी’ या हत्तीणीचा डावा पाय गंभीरपणे वाकलेला असल्याने तिला उपचारासाठी ट्रकने नेण्याच्या सरकारी सूचना होत्या. मात्र, या सूचनांचे उल्लंघन करत आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील ककोपठारपासून दिब्रुगडयेथे उपचारासाठी सुमारे ९५ किलोमीटर चालण्यास तिला भाग पाडले जात होते. या हत्तीणीच्या पाठीवर तिचा माहूत बसला होता. त्यामुळे वन्यजीवप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ‘मानिकी’ची मालकीण जोरहाट रहिवासी रूची चेतिया यांनी वनविभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
माहूत प्रदीप मोरन यांच्या मते सात-आठ दिवसांपूर्वी हा कठीण प्रवास सुरु झाला. सहा ऑगस्टपर्यंत मानिकी केवळ ३६ किलोमीटर अंतर चालू शकली. तिची अवस्था पाहून स्थानिक रहिवासी कृष्णा माझी यांनी तिला आश्रय दिला होता. दोन वर्षांपूर्वी तिच्या पायावर एक जड लाकूड पडले होते. सुरुवातीला तिच्यावर उपचार केले असले तरीही तिचा पाय बरा झाला नाही. तिच्या वेदना वाढतच गेल्या. काकोपठार येथे तिच्यावर उपचार करण्यात आले, पण योग्य उपचार उपलब्ध नव्हते.
दरम्यान, समाजमाध्यमावर ही चित्रफित सामाईक झाल्यानंतर आसाम वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी आणि पर्यावरणवादी यांचे संयुक्त पथक कृष्णा माझी यांच्याकडे पोहोचले. तिला ताबडतोब वैद्यकीय मदत देऊन प्रकृतीचे मुल्यांकन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी हत्तीणीला तीन दिवस विश्रांती घेण्याचे आणि ट्रकने वाहतुकीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. आता तिला विशेष पशुवैद्यकीय उपचारांसाठी दिब्रुगडऐवजी काझीरंगा किंवा गुवाहाटी येथे नेले जाईल. प्राण्यांच्या कल्याणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मालकाविरुद्ध कारवाई करण्याचा विचार वनविभाग करत आहे.
या घटनेनंतर प्राणी कल्याण नियमावली आणि वन्यजीव संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. समाजमाध्यमावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ‘मानिकी’ हत्तीणीची चित्रफित सामाईक होऊनही प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेला, तसेच ‘वनतारा’ या बचाव आणि पूनर्वसन केंद्रालाही समाजमाध्यमावर सामाईक झालेल्या या हत्तीणीची दखल घ्यावी वाटली नाही का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.