नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२२ च्या परीक्षेमधील ६२३ उमेदवारांची मार्च २०२४ मध्ये अंतरिम निवड यादी जाहीर झाली. त्यानंतर झालेल्या न्यायालयीन याचिकाही निकाली निघाल्या. मात्र, अनेक वर्षांच्या कष्टातून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशी महत्त्वाची पदे मिळवलेले उमेदवार एक वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

 ‘लोकसत्ता’ने अनेकदा या विषयाला वाचा फोडली. राज्य शासनाने याची दखल घेत अखेर या ६२३ उमेदवारांपैकी ४९८ उमेदवारांची नियुक्तीची यादी जाहीर केली. त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 ‘एमपीएससी’कडून राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते. परंतु, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, असा मोठा टप्पा सर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या पदांवर निवड झालेल्या अधिकाऱ्यांना अनेक वर्षे नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागते, असे चित्र आहे.

 ‘एमपीएससी’ने २०२२ मध्ये २३ संवर्गातील ६२३ पदांच्या राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात दिली. मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये तर डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मुलाखती झाल्या. १८ जानेवारी २०२४ रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली, तर २० मार्च २०२४ रोजी पदनिहाय अंतरिम यादी जाहीर झाली.

यात अनेक उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी आदी महत्त्वाच्या पदांवर निवड झाली होती. मात्र, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होताच काही उमेदवार न्यायालयात गेले. त्यामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या.

सर्व याचिका निकाली निघाल्यानंतरही आयोगाने अंतिम फेरनिवड यादीही जाहीर केली. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नव्हत्या. उमेदवारांनी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर शासनाने शुक्रवारी या उमेदवारांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली आहे.

फडणवीसांनी केले अभिनंदन शासन निर्णय आज जारी झाला असून मिळालेल्या सर्व उमेदवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून या उमेदवारांची निवड झाली होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नियुक्त्या अडकून पडल्य होत्या. अखेर, आज या ४९८ उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश पारीत झाल्याने वेटींगवर असलेल्या भावी अधिकाऱ्यांना पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच संबंधित निवड झालेले उमेदवार आपला पदभार स्वीकारतील, त्यामुळे पात्र निवड झालेल्या उमेदवारांना आनंद झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून क्लास २ च्या पोस्टसाठी उमेदवारांच्या निवडी झाल्या आहेत. त्यामध्ये, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक गट अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदींचा समावेश आहे. या पदांवर हे ४९८ उमेदवार लवकरच पदभार स्वीकारुन शासनाच्या सेवेत कार्यरत होतील.