चंद्रपूर : जलसंपदा विभागाने आखून दिलेल्या लाल व निळ्या रेषेचा फटका वडगाव व नगीनाबाग या दोन प्रभागांतील ५० हजार नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांना येथे घरांचे बांधकाम करता येत नाही, त्यासाठी गृहकर्ज मिळत नाही. परिणामी, येथे भूखंड खरेदी करून फसगत झाल्यासारखी स्थिती नागरिकांची आहे.

वडगाव व नगीनाबाग या प्रभागांत रहमतनगर, मित्र नगर, राष्ट्रवादी नगर, बापटनगर तसेच इतर छोटे वॉर्ड मोडतात. या ठिकाणी लोकांना घर बांधकामाची परवागी मिळत नाही. महापालिका मात्र या दोन्ही प्रभागांत अमृत पाणीपुरवठा योजना, विद्युत खांब, रस्ते, नाली तसेच इतर विकासकामे करीत आहेत. यामुळे येथील नागरिक संतापले आहेत.

वेकोलिच्या कोळसा खाणी आणि जंगलामुळे शहरातील मूल मार्ग, बल्लारपूर मार्ग तसेच पठाणपुरा द्वार या भागांत विकासकामे पूर्णपणे थांबलेली आहेत. या भागांत घर बांधकामाला परवानगी दिली जात नाही. याचबरोबर दाताळा व नागपूर मार्ग येथेही लाल व निळ्या रेषेमुळे २०२० पासून घर बांधकामाची परवानगी दिली जात नाही.

या भागात ज्या नागरिकांनी घराचे बांधकाम सुरू केले होते, त्यांची कामे थांबविण्यात आली, काहींची बांधकामे पाडण्यात आली तर ज्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत अर्थपूर्ण मैत्री केली त्यांची कामे सुरू आहेत.

पाठपुराव्याची मागणी

काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रेय यांनी यासंदर्भात आता पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. त्यांनी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून या विषयाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. याचबरोबर खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडेही त्यांनी हा विषय गांभीर्याने लावून धरावा, अशी मागणी केली आहे.