Hyderabad Raipur Private Bus Accident: गोंदिया: हैदराबाद वरून छत्तीसगड राज्यातील रायपूरकडे प्रवाशाना घेऊन जात असलेल्या एका खासगी  बस चालकाचे ट्रकला ओव्हर टेक करताना नियंत्रण सुटल्याने बसने ट्रकला धडक दिली.  बुधवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना कोहमारा-नवेगावबांध मार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावाजवळ घडली.

या अपघातात बसमधून प्रवास करणारे सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमीत एका सहा महिन्याच्या मुलीचा ही समावेश आहे. सर्व जखमींवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते रायपुर येथील पुष्पराज ट्रॅव्हल्स कंपनीची सी.जी. ०८ बीबी ३७२० क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल बस प्रवाशांना घेऊन हैदराबाद वरून रायपूरकडे जात होती. यावेळी बसमध्ये ३२ प्रवासी प्रवास  होते. दरम्यान, कोहमारा-नवेगावबांध मार्गावर चिखली गावाजवळ बस चालकाने समोरील ट्रकला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बस चालकाचा स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव बसची ट्रकच्या मागील भागात  धडक बसली,

ज्यामध्ये बसमधील सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले.  चिखली गावातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत डूग्गीपार पोलिसांना याबाबत माहिती दिली. सर्व जखमी प्रवाशांना  रुग्णवाहिकेतून सडक  अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सर्व जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातातील जखमींची नावे अरुणा नरसिंग नेताम (३५) रा. बालोद जि. रायपूर , दिव्यांशी पतिराम अनताम (वय ६ महिने) रा.बालोद जि. रायपूर , चंद्रभान श्यामसिंग चतुर्वेदी (३४) रा.लोटमपूर जि. रायपूर, फग्नीबाई टिकूमसिंग भुवारिया (४५) रा.संजनीया जि. राजनांदगाव, घनश्याम सुहालाल पटले (४१) रा. राजनांदगाव, सरिता भागवत पटले (३०) कवर्धा जि. रायपूर अशी या घटनेतील जख्मी प्रवाशांची नावे आहेत. त्यांना गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाईला सुरुवात केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी सांगितले की सदर सर्व प्रवासी हे हैदराबाद येथे बांधकामाचे काम करतात आणि गणपती सणानिमित्त आपल्या मूळ गावी निघाले होते.