विदर्भातील पहिला रेशीम बाजार अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बडनेरा येथील उपबाजारात सुरू झाला असून पहिल्याच दिवशी रेशीम कोशांना ६० हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. शुभारंभाच्या दिवशी सुमारे पाच लाख रुपयांची उलाढाल झाली. विदर्भातील कानाकोपऱ्यातून रेशीम कोश उत्पादक या बाजारात आले होते.
हेही वाचा- ‘माँ तुझे सलाम’ : यवतमाळकर सायकलपटूंची काश्मीर ते कन्याकुमारी मोहीम
विदर्भातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोश विक्री बाजाराचा शुभारंभ सोमवारी झाला. ही विदर्भातील पहिली रेशीम कोश बाजारपेठ आहे. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठेत ८२४ क्विंटल कोशांची आवक झाली. कोश विक्रीतून शेतकऱ्यांना ४ लाख ९९ हजार २०९ रुपये प्राप्त झाले. सर्वाधिक ६०६ रुपये किलो असा दर ब्राम्हणवाडा येथील सुनील विठ्ठल धावडे यांच्या कोशाला मिळाला. बाजार समितीला या बाजारातून ५ हजार २२५ रुपयांचा सेस प्राप्त झाला.
बुलढाणा, नरखेड, नेर, पुसद, महागाव, काटोल या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी येथे कोश विक्रीसाठी आणले होते. खरेदीसाठी नागपूर, पश्चिम बंगाल व अकोला येथून व्यापारी आले होते. पहिल्याच दिवशी आठ क्विंटलहून अधिक माल विकला जाऊन पाच लाखांवर उलाढाल झाली. हा बाजार आठवड्यातील सोमवार व गुरुवार या दोन दिवशी सुरू राहील. या सुविधेमुळे विभागात रेशीम शेतीला चालना मिळेल, असे कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी सांगितले.