उमरखेड तालुक्यातील मरसूळ येथील अनुसुचित जाती मुलींच्या निवासी शाळेत ६३ विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणामधून विषबाधा झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री जेवण झाल्यावर या विद्यार्थिनींना मळमळ, उलट्या झाल्याने त्यांनी याबाबत शाळेतील अधीक्षकांकडे तक्रार केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निवासी शाळेच्या अधीक्षकांनी मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देऊन पथकाला शाळेत पाचारण केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर प्रकृती असलेल्या काही विद्यार्थिनींना उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या निवासी शाळेमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो. तरीही येथील विद्यार्थिनींना योग्य सुविधा मिळत नाही व निकृष्ट प्रतीचे भोजन दिल्या जात असल्याने विषबाधेचा हा प्रकार घडला. त्यामुळे दोषींविरुध्द कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.निवासी शाळेच्या स्वयंपाकगृहातील अन्नाचे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा : नागपूर : आयसीआयसीआय बँकेची ४० लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी माहिती मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल दवणे यांनी दिली. परिक्षण केल्यानंतरच संपूर्ण प्रकरण लक्षात येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी दुपारी जेवणानंतरच काही विद्यार्थिनींना त्रास झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर शनिवारी रात्रीच्या भोजनानंतर विद्यार्थिनींना त्रास झाल्याने गोंधळ उडाला. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.