नागपूर : शहरातून महिला, तरुणी आणि शाळकरी मुल-मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. गेल्या १६ महिन्यांत शहरातून ७४८ मुले-मुली बेपत्ता झाल्या होत्या. मात्र, बेपत्ता मुला-मुलींच्या शोधासाठी स्थापन केलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तब्बल ७१३ जणांचा शोध घेतला.
गेल्या काही वर्षांपासून शहरातून अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे राज्यभरात पोलीस विभागाने मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाची (एएचटीयू) स्थापना केली. थेट सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचा शोध घेण्याची जबाबदारी पथकाची आहे.
बेपत्ता झालेल्या काही मुली प्रेमसंबंधातून प्रियकरासोबत पळ काढतात तर काही मुली नोकरीच्या शोधात किंवा कुणीतरी फूस लावल्यामुळे पळून जातात. २०२४ मध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. गेल्या १६ महिन्यांत नागपुरातून ७४८ मुले-मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी ७१३ मुला-मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
२०२४ मध्ये ३६७ शाळकरी मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी एचटीयू पथकाने तब्बल ३६४ मुलींचा राज्यासह अन्य राज्यातही शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिल्या. याचवर्षी १८७ अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी १८६ मुलांना शोधून काढले. गेल्या वर्षी फक्त ३ मुली आणि एक मुलगा असे एकुण चारच जण बेपत्ता असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांत १०० मुलींनी घरातून पलायन केले. पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या पथकाने तब्बल ८१ मुलींचा शोध लावून पालकांच्या स्वाधीन केले. १९ मुलींचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. तसेच ३४ अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केले. त्या सर्व मुलांचा पोलिसांनी काही दिवसांतच शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
पालकांची तक्रार देण्यास टाळाटाळ
बेपत्ता मुलींचे पालक आणि नातेवाईक बदनामी होण्याच्या भीतीने पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, यासाठी अनेक मुलींचे कुटुंबयांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळत असल्याचेही समोर आले. यापैकी काही मुली लग्न करून घरी परतल्या आहेत. मुलींना घरातील रुढी, परंपरा मान्य नसल्याने त्यांनी पलायन केल्याची माहिती आहे. मात्र, ज्या मुली घरी परतल्याच नाही, त्यांचा अद्याप पावेतो कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
ही आहेत कारणे
प्रेमप्रकरण,कौटुंबिक कलह, समाजमाध्यमांचा अतिवापर, प्रियकराकडून लग्नाचे अमिष, अनैतिक संबंध, घरात कुटुंबियांकडून कडून होणारा छळ, नोकरीचे आमिष, आर्थिक अडचण तसेच चित्रपटात किंवा टिव्ही मालिकांमध्ये काम आणि मॉडेलिंग करण्यासाठी मुली घरातून पळ काढतात. कुणाच्यातरी आमिषाला बळी पडून घरातून निघून जातात.
अल्पवयीन मुलगी किंवा तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार येताच पोलीस गांभीर्याने दखल घेतात. बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी एएचटीयू हे विशेष पथक सतत कार्यरत असते. आतापर्यंत बेपत्ता झालेल्या ९८ टक्के मुलींचा शोध घेण्यात पोलिसांनी घेतला असून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. – राहुल माकणीकर, (पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.)