अमरावती : मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पात नुकत्‍याच झालेल्‍या फुलपाखरू सर्वेक्षणात एकूण ८७ फुलपाखरू प्रजातींची नोंद करण्‍यात आली असून पाच प्रजाती प्रथमच आढळून आल्‍या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी प्रथमच मेळघाट बटरफ्लाय सर्व्हे (मेळघाट फुलपाखरू सर्व्हेक्षण) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हे फुलपाखरू सर्वेक्षण १७ ते २० नोव्हेंबर यादरम्यान पार पडले. शहानूर संकुल येथे झालेल्‍या कार्यक्रमात सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्‍यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेळघाटच्या क्षेत्रसंचालक जयोती बॅनर्जी तर प्रमुख उपस्थितीत अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक जयकुमारन, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर आणि प्रा. डॉ सावन देशमुख होते.

हेही वाचा – संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी शरद पवार १२ डिसेंबरला नागपुरात, विधानभवनावर धडकणार यात्रा

सर्वेक्षणातून फुलपाखरांची जी माहिती प्राप्त होणार आहे, ती वन्यजीव व्यवस्थापनासाठी उपयुक्त असून ती माहिती सर्व सहभागींच्या ज्ञानातसुद्धा भर पाडणारी ठरेल. त्यामुळे त्या माहितीचा उपयोग जनजागृतीसाठीसुद्धा करण्‍यात येईल, असे उपवनसंरक्षक जयकुमारन यांनी यावेळी सांगितले. यावेळी मेळघाटातील फुलपाखरांची जैवविविधता व सर्वेक्षण कार्यपद्धती याबाबत सादरीकरण करण्‍यात आले. या सर्वेक्षणात देशाच्या विविध भागांतून २५ अभ्यासक सहभागी झाले होते, वनविभागाच्‍या कर्मचाऱ्यांचादेखील या सर्वेक्षणात सहभाग होता. अभ्‍यासकांना विशिष्‍ट क्षेत्र निवडून देण्यात आले होते. त्‍यांनी या क्षेत्रात पायी फिरून फुलपाखरांची नोंद घेतली.

हेही वाचा – “पाऊले चालती शेगावची वाट…” ‘कार्तिकी’निमित्त संतनगरीत हजारो भक्तांची मांदियाळी; १५० दिंड्या दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेळघाटात यापूर्वी डॉ. जयंत वडतकर यांनी १३४ फुलपाखरांची नोंद केली होती. सर्वेक्षणादरम्यान ५ प्रथमच आढळून आलेल्या प्रजातींसह ८७ प्रजातींची नोंद झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय वनाधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्‍या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षाली रिठे तसेच वनविभागाचे स्वप्निल बांगडे, अतुल तिखे, मनीष ढाकुलकर यांनी परिश्रम घेतले.