अकोला : अवकाशात पूर्व क्षितिजावर नयनरम्य घटना लक्षवेधून घेणार असून १२ व १३ ऑगस्टला मध्यरात्री उल्का वर्षाव होणार आहे. हा प्रकाश उत्सव खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख व खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

१२ व १३ ऑगस्टला आकाशात विविधरंगी रोषणाई ‘स्विफ्ट टटल’ या धुमकेतूंच्या अवशेषातून बघता येईल. हा विविधरंगी प्रकाश उत्सव मध्यरात्रीनंतर पूर्व क्षितिजावर ययाती या तारका समुहातून प्रारंभ होईल. याचवेळी गुरू ग्रह आकाश मध्याशी सोबतीला असेल. अवकाशात येऊन गेलेले धुमकेतू, लघुग्रह आदींचे तुकडे पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्याने वातावरणात पेट घेतात, अशा उल्का अधूनमधून आकाशातून पृथ्वीवर येताना दिसतात.

उल्कांची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा निश्चित असल्यामुळे वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारका समुहातून काही उल्का अधिक प्रमाणात पडताना दिसतात, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हेही वाचा – चंद्रपूरची बांबू लेडी दिसणार ‘कोण होणार करोडपती’मध्ये

हेही वाचा – नागपूर: खेळता खेळता चिमुकला पाण्याच्या बँकेटमध्ये पडला अन्…..

सर्वसाधारण दर ताशी ६० ते १०० या प्रमाणात उल्का तुटताना दिसतील. जसजशी रात्र संपायला लागेल तसतसा उल्का वर्षावाचा वेग वाढता असेल. हा नयनरम्य नजारा ययातीकडे नजर ठेवून नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल, असे दोड म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.