नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांडाचा मुख्य आरोपी अमित साहूचा भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केला होता. यातून अनेक गुपित बाहेर येत असून मुख्य आरोपी साहू हा खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचेही प्राथमिकदृष्ट्या पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

पोलिसांना मुख्य आरोपीच्या भ्रमणध्वनीमध्ये बरीच वादग्रस्त चलचित्रे व छायाचित्रे सापडली आहेत. त्यावरून पोलिसांनी तपासही सुरू केला आहे. या चलचित्राच्या बदल्यास आरोपी साहूने त्यात दिसणाऱ्या व्यक्तीला खंडणी मागून त्रास दिला काय? वा इतरही माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. त्यासाठी या व्यक्तींशी संपर्कही साधला जात आहे. या भ्रमणध्वनीमध्ये मुख्य आरोपी साहूने किती सीमकार्ड वापरले व त्यातून कोणाशी संपर्क साधले याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणात आणखी काही नवीन आरोपी वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. या वृत्ताला पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दुजोरा दिला.

हेही वाचा – राज्यात थंडीचा मुक्काम वाढला

हेही वाचा – मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रात कोळ्याच्या तब्बल ४६ प्रजाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय?

मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये राहणाऱ्या अमित साहू याची भाजपच्या आयोजित केलेल्या एका शिबिरात सना खान यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर अमित साहूने सना खानला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी लग्न केले. यादरम्यान, अमितने सना यांच्या काही अश्लील चित्रफिती तयार करून ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू केली होती. ऑगस्ट महिन्यात अमितने पैशांच्या वादातून सना खान यांची जबलपूर येथील निवासस्थानी हत्या करून तिचा मृतदेह सहकाऱ्यांच्या मदतीने हिरन नदीत फेकला. पोलिसांनी जवळपास तीन महिने शोधमोहीम राबवली, मात्र सनाचा मृतदेह शेवटपर्यंत सापडला नाही. या प्रकरणात तपास सुरू आहे.