नागपूर शहर पोलीस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पोलीस कर्मचारी पसार झाला आहे. हेमंत कुमरे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत कुमरे हा विवाहित असून पत्नी आणि मुलांसह पोलीस लाईन टाकळी परीसरात राहतो. २०१२ मध्ये पीडित महिलेच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जरीपटक्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हेमंत कुमरेशी महिलेशी ओळख झाली होती. हेमंतने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला आणि संपर्क वाढवला. यादरम्यान महिलेच्या पतीचा मृत्यू झाला.

महिला एका मुलीसह राहत होती. त्यामुळे सहानुभूती देण्यासाठी हेमंत महिलेच्या घरी गेला. त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने हेमंतचे तिच्या घरी येणे-जाणे होते. विधवा झालेल्या महिलेने पोटापाण्यासाठी नारी रोडवर ब्युटीपार्लर उघडले होते. हेमंतची वाईट नजर या महिलेवर होती. तिला अविवाहित असल्याचे सांगून तिला जाळ्यात ओढले. २०१५ पासून दोघांचे प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्न करण्याचे आणि मुलीचा सांभाळण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला.

बळजबरीने शारीरिक संबंध

हेमंतने महिलेला भाड्याने खोली घेऊन दिली. तो रात्री-बेरात्री मद्यधुंद अवस्थेत घरी येत होता. महिलेवर बळजबरी करीत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तिला मारझोड करायला लागला. तिने लग्न करण्याचा तगादा लावला असता त्याने नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली.

अटक करण्याची द्यायचा धमकी

हेमंत हा महिलेच्या नारी रोडवरील ब्युटी पार्लरवर यायचा. तिला खोट्या गुन्ह्यात अडकून अटक करण्याची धमकी द्यायचा. कामाच्या ठिकाणी ग्राहकांना बाहेर काढून लैंगिक शोषण करीत होता. हेमंत विवाहित असून तो पत्नी आणि मुलांसह पोलीस लाईनला राहत असल्याची माहिती महिलेला मिळाली. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.