दूरचित्रवाणी आणि मोबाईलवरील गुन्हेगारीवर चित्रित चित्रपट व ‘बेवसिरीज’ पाहून एका ११ वर्षीय शाळकरी मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. शाळेला दांडी मारल्याने आई रागावेल, या भीतीपोटी त्याने ही शक्कल लढवली. मात्र, पोलीस चौकशीत हे अपहरण नाट्य बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबीयांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
येथील लहूजीनगरातील दाम्पत्याने ११ वर्षीय मुलासह २८ जुलै रोजी पडोली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. मुलाने अतिशय धीरगंभीर पद्धतीने एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून दोन जणांनी आपले अपहरण केल्याचे सांगितले. चंद्रपूरच्या दिशेने ही कार जात असताना त्यांच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यामुळे कुटुंबीय घाबरले तथा पोलिसांनीही दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने चांगलाच धसका घेतला. मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. महामार्गावर तपासणी करण्यात आली. ‘सीसीटीव्ही फुटेज’ शोधल्यानंतरदेखील तपास पथकाच्या हाती सुगावा लागला नाही. विशेष म्हणजे, मुलाने सांगितलेला वेळ व दिवस ‘सीसीटीव्ही’त बघितला असता त्यात कुठेही अपहरणकर्त्यांचे वाहन किंवा मुलगा दिसून आला नाही. अखेर काही तासांनी पोलिसांनी मुलाला विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कथा समोर आली. शाळेला दांडी मारून मुलगा घरी परत आल्याने आईने त्याला कारण विचारले. आई रागावू नये म्हणून त्याने आपले अपहरण झाल्याचे आईला सांगितले. हे ऐकून आईला धक्का बसला. मात्र, हे अपहरण नाट्य त्याने स्वत:च रचले होते.
…त्यातूनच त्याने अपहरणाचे नाट्य तयार केले –
‘बेवसिरीज,’ मोबाईल तथा दूरचित्रवाणीवर अगदी सहज दृष्टीस पडणाऱ्या या गुन्हेगारीवर चित्रित कथांचा अल्पवयीन मुलांच्या मनावर किती खोलवर परिणाम होतोय, याचे हे ताजे उदाहरण. याप्रकरणी पडोलीचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना विचारणा केली असता, त्यांनी मुलानेच अपहरणाचे नाट्य रचल्याचे सांगितले. दूरचित्रवाणी, मोबाईल तथा बेवसिरीज पाहणे या मुलाला आवडते. त्यातूनच त्याने अपहरणाचे नाट्य तयार केले. यामुळे पालकांनी आपला मुलगा काय करतो, कोणती मालिका, बेवसिरीज पाहतो, मोबाईलवर काय बघतो, याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.