अकोला : समाजमाध्यमांवर कोणती अफवा केव्हा पसरेल हे सांगता येत नाही. त्यावर येणारी प्रत्येक माहिती खरी की खोटी? हे देखील स्पष्ट होत नाही. त्यामुळे अनेक जण या अफवांना बळी पडतात.

अकोला जिल्ह्यात अशाच एका अफवेने मोठी खळबळ उडाली. जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पातूर तालुक्यातील आदिवासीबहुल पाचरण गावात ‘गणपती बाप्पाची पूजा केल्याने आरक्षण धोक्यात येईल’ अशा आशयाची अफवा पसरली.

त्यातून मनात निर्माण झालेल्या भीतीपोटी गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मूर्तीचे विसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या गंभीर प्रकरणाची चान्नी पोलिसांनी दखल घेऊन आदिवासीबहुल इतर गावातील नागरिकांमध्ये जनजागृती केल्याची माहिती ठाणेदार रवींद्र लांडे यांनी दिली.

आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात मोबाइल व त्यामध्ये समाजमाध्यमे पोहोचली आहेत. या समाजमाध्यमांचे फायदे तेवढेच तोटे देखील आहेत. यातून माहिती झपाट्याने पसरत जाते. समाजमाध्यमांतून मिळणारी माहितीची पडताळणी न करताच अनेक जण त्यावर अंधविश्वास ठेवतात. त्यातून अनेकांची फसवणूक देखील होते.

अकोला जिल्ह्यात याच प्रकारच्या एका धक्कादायक प्रकाराची चर्चा आहे. पातूर तालुक्यातील पाचरण, पांगरताटी, सोनुना या आदिवासीबहुल गावांमध्ये ‘गणपत्ती बाप्पाची पूजा केल्याने आरक्षण धोक्यात येईल’ अशी अफवा पसरली. गावात तरुणांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाची स्थापना केली होती. मात्र, अफवांमुळे त्यात विघ्न आले. ‘पुण्यावरून पाहणीसाठी विशेष समिती येणार आहे. गणपती बसविल्यास तुमचे आरक्षण जाणार आहे,’ अशी विचित्र अफवा गावात पसरली. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करणारे तरुण कार्यकर्ते प्रचंड तणावात आले. त्यांनी अचानक रविवारी मूर्तीचे विसर्जन केले.

काही गावात मोबाइल नेटवर्क नसल्याने त्या ठिकाणी अफवा पसरु शकली नाही. समाजमाध्यमावर आलेल्या एका विचित्र अफवेमुळे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. याची माहिती चान्नी पोलिसांना मिळताच त्यांनी परिसरातील विविध गावे गाठून ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांची समजूत काढली. त्यामुळे आता उर्वरित गावातील गणपती विसर्जन नियोजित वेळेतच होणार आहे.

‘गावात रविवारी गणेश विसर्जन झाल्याची माहिती मिळाली. त्यामागे अफवांचे कारण असल्याचे समजले. गणपती विसर्जन राहिलेली गावातील मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन समजूत काढण्यात आली. कोणत्याही अफवांना बळी न पडता दिलेल्या वेळेतच गणपती विसर्जन होईल,’ अशी माहिती चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी दिली.