नागपूर : बुधवारी सकाळी कळमेश्वर रोड येथींल बोधला गावातील नहरी नागपुरे यांच्या शेतात पाच फूट लांबीचा अजगर हा जंगली ससा गिळत असल्याचे त्यांनी पाहीले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने अजगराला बघण्यासाठी लोकांची गर्दी वाढली. ही माहिती ‘हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन’ संस्थेचे सर्पमित्र बंटी गोडबले, रितेश नारनवरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, तोपर्यंत अजगराने ससा गिळला होता. त्यामुळे सस्याचा जीव वाचवता आला नाही. ‘हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन’ संस्थेच्या सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक अजगराला रेस्क्यू केले आणि त्याला त्वरित नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

जे. डी इंजीनियरिंग कॉलेज परिसरात अजगराची पिल्ले…

काटोल रोड फेंटरी येथील जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात मागील दोन दिवसापासुन सतत अजगराची पिल्ले निघत आहेत. जे.डी. महाविद्यालयातून ही माहिती मंगेश रामगिरकर यांनी ‘हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन नागपुर’ चे सर्पमित्र बंटी गोडबोले यांना दिली. माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र घटनास्थळी गेले. कँटीन व इतर परिसरात जवळपास एक फ़ुटाची पाच पिल्ले रेस्क्यू करण्यात आली. या सर्व पिल्लाना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात अजुनही पिल्ले आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनुसूची एकमधील प्राणी…

भारतीय अजगराला ब्लॅक-टेल्ड पायथन किंवा इंडियन रॉक पायथन देखील म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव पायथन मॉल्युरस असुन अजगर हा साप बिनविषारी गटात मोड़तो, साधारणतः हा साप तेरा फुट ते पंधरा फूट लांबीपर्यंत वाढतो. हा साप सामान्यतः फिकट रंगाचा, तपकिरी, लालसर-तपकिरी, पिवळसर-तपकिरी आणि राखाडी-तपकिरी रंगांचा असतो. अजगर स्वत:च्या आकारानुसार उंदीर, पक्षी, लहान सरीसृप प्राणी, माकड, डुक्कर, काळवीट, हरिण, ससे यांसारखे मोठे छोटे सस्तन प्राणी देखील खातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजगर साप मार्च ते जून दरम्यान अंडी घालतात. हा साप एकावेळी १५ पेक्षा अधिक अंडी घालू शकतात. मार्च ते जून महीन्यात मादी अजगर अंडी घालते. अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याचा कालावधी समारे ५० ते ७० दिवसाचा असतो. भारतीय अजगर या सापाला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसार अनुसूची एक मध्ये येतो, अशी माहिती ‘हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन’चे स्वप्नील बोधाने यांनी दिली.