तीन महिलांसह सहा आरोपींना अटक; अपहरणाची रक्कम स्वीकारण्यासाठी तीन ठिकाणे बदलली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरीरसुखाचे आमिष दाखवून एका तरुणीने इतर पाच आरोपींसह मिळून २६ वर्षीय तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तरुणाच्या मित्राला एक लाख रुपये जमवता न आल्याने त्याने पोलीस ठाणे गाठले व पोलिसांनी अतिशय सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपींना मध्यरात्री अटक केली. हा धक्कादायक प्रकार पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला.

रंजना विलास पराते (२४) रा. नाईक तलाव, रशिका राजू घाटे (२१) रा. लष्करीबाग, सोमू दीपक चक्रधर (२९) रा. बाळाभाऊपेठ, गौरव सूर्यकांत ढवळे (३०) रा. दहीबजार, इतवारी, संग्राम ऊर्फ राजा आलोक पाठक (२२) रा. मेहंदीबाग आणि गणेश दशरथ निनावे (२५) रा. बिनाकी मंगळवारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अपहरण करण्यात आलेला तरुण हा इमारत बांधकाम काम करतो. आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी तरुणाने आपल्या मित्राशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता चुकीचा क्रमांक लागला. तो क्रमांक रंजनाचा होता.  त्यानंतर रंजनाने त्या तरुणाशी संपर्क करून संवाद वाढवला. तिने त्याला प्रेमाचे आमिष दाखवले. तरुणी स्वत: पुढाकार घेत असल्याने तो अलगद तिच्याकडे आकर्षित झाला. ती त्याच्याशी भ्रमणध्वनीवर अश्लील संवाद साधू लागली.

तिने त्याला एकटय़ात भेटण्याची इच्छा व्यक्त केली. चार-पाच दिवसांच्या भ्रमणध्वनीवरील संवादानंतर २२ जुलैलला संध्याकाळी त्यांनी कमाल चौक परिसरात भेटण्याचे ठरवले. तो आपल्या दुचाकीने तेथे पोहोचला. रंजनाही तेथे आली. ती त्याच्या दुचाकीवर बसली व फिरायला चलण्याची विनंती केली. त्याला

ती अमरावती मार्गावरील चोखरधानी हॉटेल परिसरात घेऊन गेली. त्या ठिकाणी तिने शरीरसुखाची इच्छा व्यक्त केली. तोही तयार झाला. दरम्यान, तिने मैत्रिणीला बोलवत असल्याचे सांगून इतर दोन तरुणी व तीन तरुणांना बोलावून घेतले. ते सर्वजण तेथे पोहाचले. सहा जणांनी मिळून तरुणाला कारमध्ये बसवले व रंजना ही अल्पवयीन आहे. तू तिच्यासोबत कसा फिरू कसा शकतो, असे विचारत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. तो घाबरला. आरोपींनी त्याला कारमध्ये डांबून एक लाख रुपयांची मागणी केली. तरुणाने पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्याने आपल्या मित्राला भ्रमणध्वनी करून एक लाख रुपये घेऊन पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी हिंदी हायस्कूलजवळ पोहोचण्यास सांगितले.

तरुणाच्या मित्राने पैसे जमवण्यासाठी पूर्ण तयारी केली. पण, तो अपयशी ठरला. त्याने रात्री १२ च्या सुमारास पोलीस ठाणे गाठले व सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सविता रामटेके, उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांनी तरुणाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.

कामगारांचे कपडे घालून सापळा रचला

सविता रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून सहकारी गोडबोले व इतर कर्मचाऱ्यांना बोलवून घेतले. प्रथम आरोपींनी सिंधी हिंदी हायस्कूलजवळ पैसे घेऊन मित्राला बोलवले होते. त्यानंतर त्यांनी स्थळ बदलून कॉटन मार्केट चौकात बोलवले. त्या ठिकाणी गोडबोले इतर कर्मचाऱ्यांसह आदीच हजर होते. आरोपींना संशय येऊ नये व संजयच्या जीवाला काही होऊ नये म्हणून पोलिसांनी कॉटन मार्केट चौकात काम करणाऱ्या मेट्रो कर्मचाऱ्यांचे कपडे मागितले. मजुराची वेशभूषा केली. पण, आरोपींनी पुन्हा स्थळ बदलून संजयच्या मित्राला अग्रसेन चौकात दग्र्याजवळ बोलवले.  रात्री १.३०च्या सुमारास अग्रसेन चौकात तीन महिला उभ्या असल्याचे दिसले. त्यापैकी एक भ्रमणध्वनीवर बोलत होती. पोलिसांना संशय आला. तिन्ही महिलांना ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी डागा रुग्णालयाजवळ कारमध्ये संजय असल्याची माहिती दिली.

पोलिसांना बघून पळण्याचा प्रयत्न

तीन महिलांना घेऊन पोलीस डागा रुग्णालयाकडे जात असताना तीन आरोपी पळून जात होते. पाचपावली पोलिसांनी त्यांचा जवळपास अर्धा किमी पाठलाग करून त्यांना अटक केली. संजय गाडीत सुखरूप होता. त्याची सुटका करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abduction of a youth for one lakh by showing bodily inclination abn
First published on: 26-07-2019 at 00:36 IST