अमरावती : कांडली (ता. अचलपूर) येथील वनपाल अभय भिमसेन चंदेल (वय ५०) या वनअधिकाऱ्याने शेतकऱ्याकडून सागवानी लाकडावर हॅमर मारून रहदारी पास देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाने परतवाडा वनविभागात एकच खळबळ उडाली असून, लाचखोर वनपाल अभय चंदेल सध्या फरार आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी त्याच्या मागावर आहेत. तक्रारदार शेतकऱ्याने ३१ जुलै २०२५ रोजी अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हसोना (ता. अचलपूर) येथील आठ एकर शेतीत अंदाजे १२५ सागवान झाडे होती. त्यापैकी ५० झाडे कापण्यासाठी त्यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात आपल्या मुलाच्या नावाने अर्ज केला होता. नियमाप्रमाणे कार्यवाही पूर्ण करून विभागाकडून परवानगीही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वनपाल अभय चंदेल याने रहदारी पास देण्यासाठी ११ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारीची पडताळणी अमरावती एसीबीने १ ऑगस्ट २०२५ रोजी पंचासमक्ष केली असता, अभय चंदेल याने तडजोडीनंतर ६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तात्काळ सापळा रचण्यात आला, मात्र तक्रारदारावर संशय आल्याने चंदेलने लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष सापळ्यात पकडणे शक्य झाले नाही, तरी लाच मागणी सिद्ध झाल्याने रोजी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलीमा सातव, पोलीस अंमलदार उपेंद्र श्रीगन, वैभव जायले, आशिष जांभळे आणि चालक गोवर्धन नाईक यांनी केली.
कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदल्यात लाच मागत असल्यास नागरिकांनी न घाबरता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी केले आहे. कोणी लाचेची मागणी करीत असेल, तर कोणतीही काळजी न करता त्याची एसीबीकडे तक्रार करावी. बऱ्याच वेळा सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून खूप अडवणूक झाल्यानंतर नागरिक तक्रारी देण्यासाठी पुढे येतात. लवकर काम व्हावे, म्हणून अनेक वेळा नागरिकदेखील लाच देतात. तसेच, तक्रार केल्यास आपले काम अडेल, पुढे सतत त्रास होईल, ही भीती नागरिकांनी मनातून काढून टाकावी. कारण, ज्या कामासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे, ते काम पूर्ण करून देण्यासाठी एसीबीकडून प्रयत्न केले जातात.
