लोकसत्ता टीम
नागपूर : गावात हाताला काम नसल्यामुले नागपुरातील एका ट्रकचालकाकडे एकाने स्वत:सह भाच्याला कामावर लावले. दोघेही गिट्टी भरण्याचे काम करीत असतानाच गिट्टीने भरलेला ट्रक चालविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक दुभाजकावर आदळला. या विचित्र अपघातात ट्रकचालकाची मान स्टेअरिंगमध्ये फसली तर सहचालक भाचा काच फोडून बाहेर फेकल्या गेला. ट्रकच्या मागे गिट्टीवर बसलेले मामासह तीन मजूर गिट्टीखाली दबले.
अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली. गिट्टीखाली दबलेल्या तीनही मजुरांना बाहेर काढण्यासाठी आटापीटा केला. भाच्याने स्वत:ला सावरत मामाला गिट्टीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यावे मामा शेवटच्या घटका मोजत होता. भाच्याने मामाला मांडीवर घेतले आणि वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न केला. मात्र, गंभीर जखमी मामाचा काही क्षणातच भाच्याच्या मांडीवरच प्राण गेला. उर्वरित तीन जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा विचित्र अपघात मंगळवारी रात्री अकरा वाजता नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आवंडी गावाजवळ घडला. हंसराज बीरु इवनाते (३०, कामठी, देवलापार) असे मृत मजुराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसराज ईवनाते आणि त्यांचा भाचा संदीप सुखदास उईके (२२)यांच्यासह गावाकडील राहुल रामप्रसाद उईके (२०), मंगेश रामदास उईके (२४, सर्व रा. देवलापार रामटेक) हे ट्रकमध्ये विटा व गिट्टी भरून पोहचविण्याचे काम करतात. मंगळवारी रात्री ते सर्वजन (एमएच ४० सीटी ०६५७) क्रमांकाच्या ट्रकमध्ये गिट्टी भरल्यानंतर पाचगाव येथून देवलापार येथे निघाले. यावेळी ट्रक चालक मनीष रामदास उईके (२५) याच्या बाजुला संदीप उईके तर इतर तीन जण मागच्या बाजुला (डाल्यात) बसले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस हद्दीतील नागपूर जबलपूर हायवे, आवंडी गावाजवळून जात असताना चालक मनीष उईके याने ट्रक वेगाने पळविल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्ते दुभाजकाला धडकला आणि उलटला.
या अपघातात संदीप उईके हा ट्रकच्या समोरील काच फुटून बाहेर फेकल्या गेला. तर चालक मनीष उईके हा स्टेअरिंगमध्ये अडकला. मागे असलेले तीनही मजूर गिट्टीच्या खाली दबल्या गेले. अपघातानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. गिट्टीखाली दबलेल्या हंसराज, राहुल आणि मंगेश यांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता हंसराज इवनाते यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर जखमींवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात हंसराज ईवनाते हा ठार झाला असून अन्य तीन गंभीर जखमीवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. -महेश आंधळे (ठाणेदार, नवीन कामठी)