यवतमाळ : समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची घटना ताजी असतानाच यवतमाळ जिल्ह्यात आणखी एका खासगी ट्रॅव्हल्सचा होणारा अपघात प्रवाशांच्या सतर्कतेने टळला. या घटनेत मद्य प्राशन करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकास दारव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूर येथील दशमेश ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस आहे.

दारव्हा येथे ६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कारंजा मार्गावर दशमेश ट्रॅव्हल्सची बस (क्र. एमएच ४०, सीएम १११५) चालक बेदरकारपणे चालवत असल्याचे बसमधील प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांनी तातडीने दारव्हा पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली. पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी त्वरित कारंजा मार्गावर पोहोचून या बसला थांबूवून चालकाची तपासणी केली. तेव्हा चालक दारू पिऊन असल्याचे निदर्शनात आले. पोलिसांनी बसचालक अमृत प्रल्हाद धेर (४८, रा. माहुली ता. दारव्हा) याला ताब्यात घेऊन दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता नेले. चालक मद्यप्राशन करून असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यावरून चालक अमृत थेर याच्याविरुद्ध दारूच्या नशेत सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवणे, प्रवासी व रस्त्यावरील नागरिकांचा जीव धोक्यात आणल्याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

हेही वाचा – पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ट्रॅव्हल्सची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तांत्रिक तपासणी करण्यात येते आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, उपनिरीक्षक शशिकांत दोडके, आरिफ शेख, सुरेश राठोड,अनुप मडके, चालक सलीम पठाण यांनी पार पाडली.