नागपूर : उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी नागपुरातील काही केंद्रांवर ५० रुपये अतिरिक्त शुल्क वसूलले जात असल्याचे समोर आले आहे. काही केंद्रांवर या पाटीला सुरक्षा आवरण लावण्याच्या नावावर ३०० ते ४०० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत.

‘एचएसआरपी’ बसवण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची अखेरची मुदत आहे. त्यामुळे मुदतीच्या आधी पाटी लावण्यासाठी गर्दी वाढत आहे. त्याचा गैरफायदा घेत ५० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत. परंतु, याबाबत कुणीही लेखी तक्रारी करीत नसल्याचा गैरफायदा केंद्रचालकांकडून उचलला जात आहे.

दरम्यान, नवीन पाटी कमकुवत असून ती काही दिवसांतच तुटण्याचा धोका असल्याचे सांगत ३०० ते ४०० रुपयांचे सुरक्षा आवरण घेण्याचा आग्रहही केंद्रचालकांकडून धरला जात आहे. नागपुरात दोन केंद्रांबाबत तक्रारी आल्यावर एकाची मान्यता रद्द करण्यात आली तर दुसऱ्या केंद्रावरील काम थांबवण्यात आले.

दर नेमके किती?

राज्यात शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार दुचाकी वाहनांसाठी सर्व कर व शुल्कासह (मोटारसायकल, स्कूटर, ट्रॅक्टर) ५३१ रुपये, तीन चाकी (ऑटो-रिक्षा) ५९० रुपये, चारचाकी आणि मोठी वाहने (कार, बस, ट्रक, टेम्पो) ८७९ रुपये इतका दर आकारण्यात आला आहे.

“शुल्काच्या नावावर कोणतेही अतिरिक्त शुल्क केंद्र चालकाला घेता येत नाही. नागपुरातील नितीन गिरी यांनी दाभा परिसरातील एका केंद्रावर ५० रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची तक्रार केल्यावर या केंद्रावरील काम थांबवले आहे.”- अमिर हुसेन, रोझमेर्टा सेफ्टी सिस्टम्स लिमिटेड, नागपूर.