नागपूर : मिहानमधील ‘इंदमार’ कंपनीचे विमान देखभाल-दुरुस्ती केंद्र (एमआरओ) अदानी समूहाने खरेदी केल आहे. त्यासंदर्भातील माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली. या सुविधेत दहा ‘हँगर’ असून त्यात एकूण १५ विमाने ठेवण्याची क्षमता आहे.
‘अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ने (एडीएसटीएल) मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील ‘इंडामर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड’मधील (आयटीपीएल) एमआरओ खरेदी केले. यासंदर्भात अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी म्हणाले, हे अधिग्रहण भारताला जगातील प्रमुख विमान देखभाल-दुरुस्ती सेवा केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या उपक्रमातील पुढील पाऊल आहे.
‘आयटीपीएल’ने नागपुरातील ३० एकर क्षेत्रफळात अत्याधुनिक केंद्र उभारले आहे. ‘आयटीपीएल’ला ‘डीजीसीए’, ‘एफएए’ (यूएसए) आणि इतर जागतिक नागरी एव्हिएशन नियामक संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. ही कंपनी भारत आणि जगातील प्रमुख ग्राहकांना विमान देखभाल-दुरुस्ती सेवा पुरवते.
‘आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा’
‘अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेस’चे सीईओ आशीष राजवंशी म्हणाले, हे अधिग्रहण अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेसच्या दुरदृष्टीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आम्ही ‘एमआरओ’ सेवा प्रदान करण्यास उत्सुक आहोत. इंडामर टेक्निक्स आणि प्राइम एअरोचे संचालक प्रजय पटेल म्हणाले, आम्ही अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेससोबत मिळून इंडामर टेक्निक्सला नवीन उंचीवर नेऊ. भारतातून एक जागतिक दर्जाचे ‘एमआरओ इकोसिस्टम’ निर्माण होण्याचे स्वप्न याद्वारे पूर्ण होईल.