नागपूर : जिल्ह्यातील दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीला देण्याचे प्रस्तावित आहे. या विरोधात १० सप्टेंबर रोजी आयोजित सुनावणी नागरिकांनी उधळून लावली. असाच विरोध याआधी जुलै २०२३ मध्ये अदानी समूहाला गोंडखैरी भूमिगत कोळसा खाणीला झाला होता. मात्र, येथे काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे दहेगाव गोवारी प्रकल्पातही असे घडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
आधीच्या म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी कोळसा खाणीचा पट्टा अदानीला देण्यात आला होता. या खाणीला तेथील २४ प्रमुख गावे व ८० च्यावर लहान गावांचा विरोध होता. कंपनीच्या अर्जानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) १३ जुलै २०२३ रोजी कारली तलावाजवळ पर्यावरणीय जनसुनावणी घेतली. त्यावेळी तेथील २४ ग्रामपंचायतींनी ठराव पारित करीत खाणीला विरोध दर्शवणारे पत्र दिले. त्यानंतरही या खाणीत काम सुरू करण्याला नुकतीच केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
आता अदानी समूहाच्याच अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीला नागपूर जिल्ह्यातील दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण देणे प्रस्तावित आहे. याबाबत बुधवारी (१० सप्टेंबर) वलनी येथे जनसुनावणी झाली. येथेही खाणीला प्रचंड विरोध केला. नागरिकांचा कौल घेतला असता सर्व उपस्थितांनी खाणीच्या विरोधात हात वर करून मत नोंदवले. येथील प्रभावित दहा गावांतील सर्व नागरिकांनीही प्रकल्प होऊ देणार नसल्याचे सांगत अदानीविरोधी घोषणा दिल्या. शेवटी उपस्थितांची मागणी इतिवृत्तात नोंदवून सुनावणी पूर्ण झाल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे आता केंद्रीय कोळसा मंत्रालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अदानींच्या कंपनीतील संबंधित अधिकाऱ्याला ईमेल द्वारे याबाबत प्रतिक्रिया विचारली असता वृत्त लिहिस्तोवर ती मिळाली नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे काय ?
दोन वर्षांपूर्वी गोंडखैरी भूमिगत कोळसा खाणीच्या जनसुनावणीत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून कडाडून विरोध झाला होता. तरीही या खाणीत काम सुरू करण्याला मंजुरी मिळाली. आता दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाच्या सुनावणीतही सर्व उपस्थितांनी प्रकल्पाला विरोध केला. परंतु, पुढे काय होणार त्याबाबत सांगता येत नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी दिली.