नागपूर : शहरातील विविध भागात पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे झोपडपट्टी भागात पर्याप्त दाबाने पाण्याचा पुरवठा करा आणि शहरातील ज्या भागात पाणीटंचाई आहे, अशा भागात टँकरच्या फेऱ्या वाढवा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मंगळवारी शहरातील पाणीटंचाई व त्यावरील उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दहाही झोनमधील सद्यस्थितीचा आढावा घेतला. शहरात ज्या भागात पाणीटंचाई आहे अशा भागात टँकरने पाण्याची व्यवस्था करा. तसेच झोपडपट्टी भागातील नळाला पर्याप्त दाबाने पाण्याचा पुरवठा करा. पाण्याच्या समस्येवर वेगवेगळय़ा भागातील नागरिकांचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे. यासाठी ‘ऑरेंज सिटी वॉटर कंपनी’तर्फे व्यवस्था करावी, अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. यावर्षी उष्णता जास्त असल्यामुळे नागरिकांचा पाण्याचा वापर वाढलेला आहे.

पाण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये, त्यांना स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी नागपूर महापालिका व ‘ऑरेंज सिटी वॉटर कंपनी’ची आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा ठिकाणीसुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. फुटलेल्या आणि दूषित जलवाहिनी तत्काळ बदलवाव्यात. अवैध नळ जोडणाऱ्यांवर कारवाई करावी. टुल्लू पंप थेट नळाला लावणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन टुल्लू पंप जप्तीची कारवाई करावी, ‘नॉन नेटवर्क’ भागातसुद्धा आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ऑरेंज सिटी वॉटर कंपनीतर्फे शहरात केल्या जाणाऱ्या उपाययोजना व त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.

११ टुल्लू पंप जप्त

उन्हाळय़ातील पाणीटंचाई व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता महापालिकेतर्फे टुल्लू पंप जप्तीची कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, नेहरूनगर झोनतंर्गत ११ टुल्लू पंप जप्त करण्यात आले. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी टुल्लू पंप जप्तीचे आदेश विभागाला दिले आहे. त्यांच्या निर्देशानुसार नेहरूनगर झोन अंतर्गत नंदनवन झोपडपट्टी गल्ली क्र. १, २ व ३ या भागात टुल्लू पंप जप्तीची कारवाई करण्यात आली. उन्हाळय़ाच्या दिवसात अनेक नागरिक अवैधरित्या नळाला टुल्लू पंप लावून पाण्याची चोरी करतात. यावर आळा घालण्यासाठी मनपाद्वारे टुल्लू पंप जप्तीची कारवाई केली जात आहे.

२०४.३७ कोटींची थकबाकी

गेल्या वर्षभरात पाणीबिलात अकरा टक्क्यांनी वाढ झाली असून १ एप्रिल २०२१ रोजी असलेली १८२.७ कोटींची थकबाकी ३१ मार्चपर्यंत २०४.३७ कोटींवर गेली आहे. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या आकडेवारीनुसार, सर्वसामान्य नागरिकांबरोबरच भारतीय रेल्वे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि मोठी रहिवासी संकुले यांचा थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. मात्र, महापालिका मोठय़ा थकबाकीदारांऐवजी लहान ग्राहकांवर कारवाई करीत असल्याचे चित्र आहे.