केंद्रीय प्रवेश समिती सदस्याची शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार
एकीकडे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमार्फत गुणवत्तेनुसार प्रवेश होत असल्याची हाकाटी पिटत असताना दुसरीकडे खासगी शिकवणी वर्गाशी संगनमत असलेल्या त्याच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत केंद्रीय प्रवेश समितीने शेकडोंच्या संख्येने प्रवेश करण्यामागचे गौडबंगाल काय, प्रश्न केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्याने विचारून समितीला घरचा अहेर दिला आहे.
रविवारी, ३ जुलैपासून द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होत आहेत. मात्र, समितीच्या एकूण कामावरच समिती सदस्य आणि नागपूर जिल्हा शाळा व्यवस्थापन संघाचे रवींद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भातील एक तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे करून त्यांनी नागपूर शहरातील उच्च माध्यमिक शाळांमधील पायाभूत सुविधांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
शहरातील काही उच्च माध्यमिक शाळांमधून बारावीच्या शिक्षण मंडळाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याचाच अर्थ त्या उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीत जवळपास तेवढेच विद्यार्थी शिक्षण घेत होते. या सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग व्यवस्था, अध्यापनासाठी प्रशिक्षित व मान्यताप्राप्त शिक्षकांची सुविधा व इतर भौतिक सुविधा उपलब्ध आहेत काय, याची पाहणी न करताच तुकडय़ांचे वाटप करण्यात आले. सुविधांचा अभाव असूनही एकेका शाळेत तुकडय़ांची खैरात वाटल्याने ९०० ते १००० विद्यार्थी एकाच शाळेला मिळाले. बाकी शाळा खास करून अनुदानानित शाळा त्यामुळे ओस पडल्या. मग या विद्यार्थ्यांना त्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाध्य करणारे खासगी शिकवणी वर्ग आणि शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे संगनमत असते हे लपलेले नाहीच. मात्र, अशा स्थितीत अकरावी केंद्रीय प्रवेश समितीनेही उडी घेऊन ठरावीक शाळांना विद्यार्थ्यांचा पुरवठा करणे हे समितीच्या प्रामाणिक कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सध्या धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या परिसरात समितीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अर्जाची छाननी करताना ते पालक, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांऐवजी खासगी शिकवणी वर्गातून आम्ही भरून घेतल्याचे काही पालकांनी भाबडेपणाने सांगितले. त्यामुळेच अकरावीच्या अर्जावर पहिल्या पाच-सहा नावानंतर ४००, ४४५, ६००, ९०० असे मोघम पसंतीक्रम देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच अकरावीचे अर्ज खासगी शिकवणी वर्गामार्फत भरले जात असल्याची शंकाही काही समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे.
मार्च २०१६च्या राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी रेशीमबागेतील प्रेरणा कनिष्ठ महाविद्यालयातून १००२ विद्यार्थी बसले होते. मेजर हेमंत जकाते इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीतून ७०३, हुडकेश्वरच्या जकाते कनिष्ठ महाविद्यालयातून ३२९, पाचपावलीच्या सिंधू कनिष्ठ महाविद्यालयातून ९२९ आणि हुडकेश्वरच्या सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयातून ९७९ विद्यार्थी परीक्षेला बसल्याची काही नमुनेदाखल उदाहरणे देऊन फडणवीस यांनी या उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

अकरावीचे ऑनलाईन प्रवेश हवेत
खासगी शिकवणी वर्ग आणि शाळा महाविद्यालयांत संगनमत असल्याची बाब लपून राहिलेली नसून त्याच शाळांमध्ये केंद्रीय प्रवेश समितीही कशी काय प्रवेश देऊन त्या शाळांमधील प्रवेश वाढवण्यासाठी हातभार लावते. त्यातील नेमके गौडबंगाल काय? समितीचे एकगठ्ठा अर्ज खासगी शिकवणी वर्गाना मिळतातच कसे? विद्यार्थी पसंतीक्रम देताना ठरावीक शाळेत प्रवेश करतात कसे? इतरत्र अकरावीचे ऑनलाईन प्रवेश होत असताना नागपुरातच ते का होत नाहीत? असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.
चौकशी सुरू -डॉ. पटवे
या संदर्भात अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव आणि सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. एस.एन. पटवे म्हणाले, यावर्षी कोणालाही तुकडय़ा वाढवून दिलेल्या नसून गेल्यावर्षी एकूण १४३ तुकडय़ा होत्या. विज्ञानच्या (इंग्रजी) १३३ तुकडय़ा होत्या तर प्रवेश क्षमता १९,७२० होती. विज्ञान (उर्दू) आणि गृहविज्ञानच्या प्रत्येकी पाच तुकडय़ांची प्रवेश क्षमता ४०५ आहे. नागपूर शहरात एकूण २०,१२५ प्रवेश क्षमता आहे. यापूर्वी दिल्या गेलेल्या तुकडय़ांसाठी शाळेत जाऊन तेथील पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. तरीही फडणवीस यांच्या तक्रारीवर चौकशी सुरू आहे.