नागपूर : हुडकेश्वर रोडवरील साईं कृष्णा रेसीडेंसी मधील पार्किंग एरिया मध्ये जवळपास तीन फूट लांबीचा पांढऱ्या रंगाचा साप दिसताच ही बातमी झपाट्याने पसरली. पांढरा साप पाहण्यासाठी लोकांची बरीच गर्दी जमली होती. ही माहिती ‘हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन नागपूर’ चे सर्पमित्र सतीश जांगड़े, आशीष मेंढे, सुमित बेनीबागडे यांना मिळताच घटनास्थळ गाठले. पहिल्यांदा तो अल्बिनो असावा असे वाटले, पण सापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू करुन छायाचित्र सर्पअभ्यासक स्वप्निल बोधाने यांना पाठवले. तर ‘पेस्टल बॉल पायथॉन’ गटात मोडणारा साप असल्याचे सिद्ध झाले. यासाठी काही तज्ञांची देखील मदत घेण्यात आली.
बॉल पायथन रेस्क्यू करण्याची शहरातील पहली घटना आहे. हा साप कोणाचा पाळीव साप असू शकतो. तो घरातून निघाला असेल किंवा तो पाळणाऱ्याने त्याला सोडून दिले असेल. हा साप वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसार अनुसूची चारमध्ये येतो. हे साप पश्चिम आणि मध्य आफ्रिकेचे मूळ निवासी आहेत. नागपुरात ते दहा ते ३० हजार रुपयापर्यंत विकले जातात. अलीकडेच विदेशी मोठा सरडा अंगावर घेऊन फिरणाऱ्या नागरिकाचे एक छायाचित्र समाजमाध्यमावर सामाईक झाले होते.
विदेशी साप जवळ असेल तर नोंदणी अनिवार्य…
शहरातील पेट शॉप, एक्वेरियम शॉप मध्ये सध्या विदेशी पक्षी, साप, सरडे, कासव पाहायला मिळत आहेत. मात्र, या एक्झॉटिक्स प्राण्यांना तापमान व उचित देखरेखीची गरज असते. काही लोक हौसेपोटी खरेदी करतात, पण त्यानंतर योग्य देखभाल शक्य नसल्याने त्याला सोडून देतात. जवळ विक्रीस असलेल्या अथवा पाळीव स्वरुपात असलेल्या एक्झॉस्टिक सापांची नोंदनी न केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ५१(१) अनव्ये वनविभाग त्यावर कारवाई करू शकतात. – स्वप्निल बोधाने, हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन
विदेशी सापांना विशेष काळजीची गरज..
बॉल पायथन सापाला योग्य वातावरण, विशेष काळजीची व ठेवण्याच्या उत्तम सोई आवश्यक असतात, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय नागपूर येथे बॉल पायथन साप आहेत, अशी माहिती आम्हाला उपलब्ध झालेली आहे, म्हणून ‘हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन’ने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य यांना ईमेलद्वारे तसेच गोरेवाडा प्राणिसंग्रहालय संचालकांना या सापाची माहिती दिली. या सापाला गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय नागपूर येथे ठेवण्याची विनंती देखील केली. – आशिष खाडे, अध्यक्ष, हेल्फ फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन