लोकसत्ता टीम

नागपूर: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपू नये अशा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानंतरही राज्यातील काही भागात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सेवा लावल्या जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने केला आहे.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्याही निवडणुकीत सेवा लावल्या जात होत्या. हा प्रकार पुढे आल्यावर निर्णय मागे घेण्यात आला. परंतु आता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांच्याही निवडणूक कामात सेवा घेण्याबाबतचे आदेश निघाले आहेत. त्यावर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेने संताप व्यक्त करत भर उन्हात उष्माघात वा इतर रुग्ण वाढण्याचा धोका असताना डॉक्टरांना निवडणूक कामात लावल्यास रुग्णांना सेवा देणार कोण, हा प्रश्न उपस्थित केला आहे.

आणखी वाचा-पार्किंगची सोय नाही म्हणून परवाना नाकारला, उच्च न्यायालय म्हणाले, असा काही नियम नाही…

दुसरीकडे भारतीय निवडणूक आयोगाच्या निकषानुसार डॉक्टर- परिचारिकांसह आरोग्य कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडतात. या संवर्गातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीत सेवा लाऊ नये असे निवडणूक आयोगाचे निकष आहेत. त्यानंतरही सेवा कशा पद्धतीने लावल्या जात आहे, हा प्रश्नही संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. समीर गोलावार यांनी उपस्थित केला. या विषयावर निवडणूक आयोगाकडे संघटनेकडून दाद मागण्यात येणार असल्याचेही डॉ. गोलावार यांनी स्पष्ट केले. मुंबईत डॉक्टरांना निवडणूक कामात घेण्याचा निर्णय जसा मागे घेतला, त्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरमधूनही डॉक्टरांना या कामातून वगळण्याची मागणी त्यांनी केली.