पुणे : शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना आणि पदवी, पदव्युत्तर स्तरावरील अतिरिक्त जागांना मान्यता देण्यात आलेली नाही. या संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भागधारकांनी या बाबतच्या निराधार चर्चा, वृत्तांकडे लक्ष न देण्याचे आवाहन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून करण्यात आले.
नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता या बाबतची चर्चा समाजमाध्यमे, माध्यमांतून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले.
हेही वाचा…बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार
मेडिकल कौन्सीलने नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिलेली नाही. विविध वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व, पदव्युत्तर स्तरावरील जागांही वाढवण्यात आलेल्या नाहीत. शैक्षणिक सत्र २०२४-२५संदर्भातील निर्णय झालेला नाही. शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी आलेल्या अर्जांवरील प्रक्रिया सुरू आहे. निर्णयाबाबतची अधिकृत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे भागधारकांनी अन्य कोणत्याही निराधार चर्चा, वृत्तांकडे लक्ष देऊ नये, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.