Nagpur Breaking News Update Today : औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादाचे रूपांतर दंगलीत झाले. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपरत शेकडो गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. त्यामुळे रस्त्यावर काचांचा आणि दगडांचा अक्षरशः ढीग पडला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी अजूनही या परिसरात भयाण शांतता आहे. मात्र, या भीतीयुक्त वातावरणातही नागपूर महापालिकेचे सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आणि पहाटेपर्यंत त्यांनी या संपूर्ण रस्त्यावरील दगड आणि काचा उचलून रस्ता स्वच्छ केला.

नागपुरात उसळलेल्या या हिंसाचारात दोन मोठ्या क्रेनसह जवळजवळ ५० दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. हंसापुरी, चिटणीस पार्क, अग्रसेन चौक, शिर्के गल्ली, शिवाजी पुतळा या संपूर्ण परिसरात रस्त्यावर काचांचा खच पडलेला होता. छोट्या मोठ्या दगडांचा ढीग पडला होता. दंगल घडवून आणणाऱ्यानी मिळेल त्या साधनांचा वापर केल्याने त्याचाही कचरा रस्त्यावर विखुरलेला होता. जमावाला पांगवताना आणि परिस्थिती नियंत्रणात आणताना अनेक पोलीस कर्मचारी यात जखमी झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री उशिरा परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली असली तरी भीतीयुक्त वातावरण कायम होते. परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र रस्त्यावरील कचऱ्याचा मोठा प्रश्न होता. संपूर्ण रस्त्यावर काचा, दगड आणि वस्तू पसरल्याने त्यावरून पडून आणखी लोक जखमी होण्याची शक्यता होती. पोलीस कर्तव्यावर होते आणि म्हणूनच मग महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. रात्री एक वाजेपासून तर पहाटे पाच वाजेपर्यंत महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी हंसापुरी, चिटणीस पार्क, अग्रसेन चौक, शिर्के गल्ली, शिवाजी पुतळा या संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवत होते. त्यांनी रस्त्यावरील काचांचा ढीग, दगड, कचरा उचलत हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला.