नागपूर: अग्निवीर ही भारतीय सशस्त्र दलांमध्ये भरती होण्याची एक योजना आहे.या योजनेत, तरुणांना चार वर्षांसाठी सैन्य दलात सामील होण्याची संधी मिळते, त्यानंतर त्यांना निवृत्त केले जाते. या योजनेला ‘अग्निपथ योजना’ असेही म्हणतात. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी अनेकदा या योजनेला विरोध केला आहे. सरकारकडून अग्निवीरांना कुठलेही संरक्षण नसल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच चार वर्षांसाठी ही योजना न ठेवता अग्निवीरांना कायमस्वरूपी करा, अशीही मागणी केली.

अग्निवीरांसाठी नुकतीच एक परीक्षा घेण्यात आली असून त्याचा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे हजारोंना आता चार वर्षे सेवेची संधी मिळणार आहे. अनेकांना भारतीय सैन्यात काम करून देशाची सेवा करायची इच्छा असते. अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. 

भारतीय सैन्याने अग्निवीर भरती २०२५ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) चा निकाल शनिवार २६ जुलै २०२५ रोजी जाहीर केला आहे. उमेदवार भारतीय सैन्य अग्निवीर निकाल joinindianarmy.nic.in वर पाहू शकतात. अग्निवीर सीईई ३० जून ते १० जुलै २०२५ दरम्यान घेण्यात आला. ही परीक्षा १३ भाषांमध्ये घेण्यात आली: इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगू, पंजाबी, उडिया, बंगाली, उर्दू, गुजराती, मराठी आणि आसामी. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती आणि बहुपर्यायी प्रश्न वापरून घेण्यात आली होती. उमेदवारांना अर्ज श्रेणीनुसार एका तासात ५० प्रश्न किंवा दोन तासांत १०० प्रश्न विचारायचे होते. 

अग्निवीर निकाल तपासण्यासाठी, उमेदवार खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात.

१. भारतीय सैन्य अग्निवीर भरतीची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट द्या.

२. होम पेजवर उपलब्ध असलेल्या इंडियन आर्मी अग्निवीर सीईई निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.

३. तुमचे लॉगिन तपशील प्रविष्ट करा.

४. सबमिट करा आणि निकाल तपासा.

काय आहे अग्निपथ योजना?

अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीवर काम करता येणार. चार वर्षांसाठी काम करणाऱ्या या सैनिकांना अग्निवीर म्हटले जाईल. ही स्थायी स्वरुपाची सेवा नसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवड झालेल्या तरुणांना पहिले सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर उरलेले साडेतीन वर्षं त्यांना सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील २५ टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. त्यासाठी त्यांना आणखी सहा महिन्यांचे स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल. कामगिरीच्या आधारावर २५ टक्के तरुणांची निवड केली जाईल. उरलेल्या ७५ टक्के तरुणांना लष्कराकडून स्किल सर्टिफिकेट दिले जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी त्याचा फायदा होईल. ( राज्य सरकार त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये नोकरी देऊ शकतात. ) पहिल्या ४ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुढच्या ९० दिवसांत म्हणजे तीन महिन्यात अग्निपथ योजनेअंतर्गत पुन्हा भरती सुरू होईल. वय वर्षे १७ ते २१ दरम्यानच्या तरुणांना या अग्निपथ योजनेचा लाभ घेऊन सैन्यात चार वर्षांसाठी भरती होता येईल. या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी महिन्याकाठी ३० हजार रुपये, तर चौथ्या वर्षी यात वाढ होऊन ४० हजार रुपये वेतन मिळेल.