राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराच्या मध्यभागी महाराजबाग आणि कृषी विद्यापीठाची  शेकडो एकर जमीन आहे. त्यावरील हिरवळीमुळे  शहर काही प्रमाणात कां होईना  प्रदूषणपासून दूर आहे, परंतु विकासाच्या नावावर या जमिनीचे लचके  तोडण्यात येत असून आतापर्यंत २१५ एकरहून अधिक जमीन रस्ते, कार्यालये आणि इतर योजनांसाठी घेण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाची इमारत मोक्याच्या जागी आहे. शिवाय विद्यापीठाची जमीन रामदासपेठ, बजाजनगर, शंकरनगर आदी उच्चभ्रू वस्त्यांना लागून आहे. या जमिनीवर राजकीय नेत्यांची कायम वक्रदृष्टी राहिली आहे. ही मंडळी सार्वजनिक हिताच्या  प्रकल्पांची ढाल करत कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा ताबा घेत आहेत. नागपूर शहर विकास आराखडय़ात देखील अनेक रस्ते या जमिनीवर दाखण्यात आले. त्यापैकी दोन रस्ते महाराजबागेच्या दोन्ही बाजूला तयार करण्यात देखील आले आहे. आता पुन्हा एक रस्ता रामदासपेठेतील कल्पना बिल्डींग टी-पाईंट ते शासकीय आयटीआयपर्यंत करण्याचे प्रस्तावित आहे. हा रस्ता देखील विद्यापीठाच्या जागेवर राहणार आहे. नागपूर महापालिकेने व्ही.आय.पी. रोडला लागून (वनामती शेजारी) असलेल्या जमिनीवर वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅक करण्याचे ठरवले आहे.

मेट्रो रेल्वेच्या मुख्य कार्यालयाची इमारत देखील कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आली आहे. त्याच्या शेजारी महावितरणाचे कार्यालय येणार आहे. दीक्षाभूमीवर कृषी विद्यापीठाच्या या जागेवर विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. त्यांच्यासाठी असलेल्या मैदानावर या मेट्रोची टोलेजंग इमारत उभी झाली आहे. सोबत त्याच्या शेजारी महावितरणची इमारत उभारण्यात येत आहे.

दिल्लीत प्रदूषणाची समस्या वाढल्यावर अनेक भागात दोन-तीन किलोमीटपर्यंत झाडे लावली आहेत. तरी देखील तेथे वायू प्रदूषण वाढते आहे. नागपुरात कृषी विद्यापीठाच्या जागेमुळे हिरवळ आहे. ती  नष्ट करण्याचा डाव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील हिरवळ नष्ट करून शहर विकासाचे स्वप्न दाखवले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे अग्रोव्हॅट-अग्रोइंजिनिअर मित्र परिवार संघटनेचे सचिव प्रणय पराते यांनी म्हटले आहे.

२६.६९ हेक्टरवर अतिक्रमण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने त्यांच्या  जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली, परंतु कृषी विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी  सरकारला काहीही  प्रयत्न करीत नाही. राज्य सरकारकडून काचीपुरा येथील अतिक्रमण हटवण्याला स्थगिती देण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या मौजा सीताबर्डी, फुटाळा, लेंढरा, दाभा, तेलंगखेडी आदी ठिकाणी २६.६९ हेक्टरवर अतिक्रमण आहे.

नागपूर कृषी महाविद्यालयाकडे ४४६.२१ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी ५९.३९ हेक्टर जमीन यापूर्वी शासकीय व निमशासकीय संस्थेला हस्तांतरित करण्यात आली आहे, तर २६.६९ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. सध्या महाविद्यालयाकडे ३६०.१३ हेक्टर जमीन उरली आहे.

‘‘ देशातील पहिल्या पाच कृषी महाविद्यालयांपैकी नागपूरचे कृषी महाविद्यालय आहे. शहरासाठी भूषणावह ही बाब आहे. येथील पायाभूत सुविधा विकसित झाल्या आहेत. पाण्याची व्यवस्था करून प्रयोगांची संख्या वाढवता येईल. परंतु अस्तित्वात असलेल्या सुविधा आणि जमिनी बळकवण्याचे प्रयत्न होणे चुकीचे आहे.’’

– डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural universitys breakdown of land and urban development
First published on: 30-10-2018 at 02:39 IST