यवतमाळ : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना जिल्ह्यात बोगस बीटी बियाणे विक्रीस आले आहे. अनेक कृषी केंद्रातून या बियाण्यांची शेतकऱ्यांना विक्री होत आहे. राळेगाव तालुक्यात कृषी विभागाच्या कारवाईत तिघांना अटक करून बीटी बियाणे जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी तालुक्यातील रिधोरा येथे करण्यात आली.
हेही वाचा >>> यवतमाळच्या महिला बँकेतील अपहारप्रकरणी संचालकांवर जबाबदारी निश्चित; ९७ कोटींच्या भरपाईचे आदेश
प्रफुल्ल मोरेश्वर गोहकार ( २९, रा. वडकी), निखील शालीक हाते (३१), नीलेश तुळसीदास कुडे (२१, दोघेही रा. ऐकुर्ली), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही राळेगाव ते वडकी रोडवरील रिधोरा फाटा चौकात प्रतिबंधित बिटी बियाणे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरून कृषी विभागाने पोलीस विभागाशी संपर्क साधला. पोलिसांची मदत घेवून कृषी विभागाने रिधोरा फाटा चौकात सापळा रचला. यावेळी दोन दुचाकी बस निवाऱ्याजवळ येऊन थांबल्या. पथकातीलच पंकज बर्डे यांना ग्राहक बनवून पाठविण्यात आले. बनावट बिटी बियाणे असल्याचा इशारा मिळताच पथकाने छापा टाकून तिघांनाही ताब्यात घेतले. यावेळी एकूण एक लाख ४२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे व पोलीस विभागाच्या पथकाने केली.