अमरावती : अमरावती विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवेचे संचालन करणाऱ्या अलायन्स एअरने निमंत्रणाच्या पत्रात विमानतळाच्या नावाचा उल्लेख डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा केल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) आक्षेपानंतर अलायन्स एअरने ते पत्र मागे घेतले.
पण, बुधवारी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रफितीत प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असे नाव दर्शविण्यात आल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला. त्याची चांगलीच चर्चा रंगली. अखेरीस पुन्हा एकदा ‘एमएडीसी’वर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रदर्शित करण्यात आलेल्या दृकश्राव्य फितीमध्ये “प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ” असे नाव दर्शविण्यात आले, पण विमानतळाच्या नामकरणासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय शासन स्तरावर अद्याप घेण्यात आलेला नाही, सदर नावाचा उल्लेख हा कार्यक्रम व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे घडलेली चूक असून, दृश्य सादरीकरणामधील क्रिएटिव्हज आमच्या संमतीशिवाय व माहितीशिवाय तयार करण्यात आले व प्रदर्शित करण्यात आले.
तरी सदर बाब अनवधानाने घडलेली असून ती कोणत्याही प्रकारे शासनाच्या अधिकृत निर्णयाचे प्रतिनिधित्व करत नाही, हे नम्रपणे कळविण्यात येत आहे. सद्यस्थितीत संबंधित विमानतळास “अमरावती विमानतळ” या नावानेच संबोधित करण्यात येईल. सदर एजन्सीकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून, दोषी पक्षाविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे ‘एमएडीसी’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.‘अलायन्स एअर’ने पहिल्या निमंत्रणाच्या पत्रात अमरावती विमानतळाचा उल्लेख डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा केल्याने निर्माण झालेल्या गोंधळावर अखेर ‘अलायन्स एअर’नेच खुलासा केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी पाठवलेल्या पत्रात चूक सुधारली होती.
मुंबई-अमरावती-मुंबई या विमानसेवेच्या शुभारंभाच्या संदर्भात १० एप्रिल रोजी निमंत्रण पत्र तयार करण्यात आले होते. त्यात अमरावती विमानतळाचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ असे लिहिले होते. मात्र विमानतळाचे अचूक नाव अमरावती विमानतळ आहे.डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ हे नाव ‘गुगल सर्च’ वरून घेतले आहे पण अधिकृत पत्रव्यवहारात अमरावती विमानतळ असे नाव नमूद करण्यात आले आहे. १० एप्रिल २०२५ रोजीचे पूर्वीचे पत्र मागे घेण्यात आले आहे, असे ‘अलायन्स एअर’चे चेअरमन अमित कुमार यांनी म्हटले होते. पण, आज पुन्हा नवीन प्रकारचा गोंधळ उडाला.