हिवाळी अधिवेशन आणि नाताळला लागून आलेल्या सुटय़ा असे समीकरण दरवर्षीचेच आणि त्या अनुषंगाने विमानांची भाडेवाढही ठरलेलीच असते. अधिवेशनाहून परतणारे राजकारणी आणि नाताळच्या सुटय़ांमध्ये पर्यटनासाठी जाणारे सामान्य नागरिक अशा दोघांच्याही गरजेचा गैरफायदा घेत यावर्षीसुद्धा विमान कंपन्यांनी प्रचंड भाडेवाढ केली आहे. रेल्वेची तिकिटे आरक्षित करण्यात येत असल्याने विमानप्रवास हा शेवटचा पर्याय त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे विमान कंपन्यांनी भाडेवाढ केली तरी कंपन्यांकडून होणारी मुस्कटदाबी सहन करण्यावाचून ना राजकारण्यांना ना सामान्य नागरिकांना पर्याय असतो.
हिवाळी अधिवेशनासाठी राज्यातील सर्व आमदार, मंत्री आणि अधिकारी नागपुरात होते. आज, बुधवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपापल्या मतदारसंघात परतीच्या प्रवासाला ते निघाले. याच कालावधीत शाळांना नाताळच्या सुटय़ा लागल्या आहेत. ही नामी संधी साधून विमान कंपन्यांनी विमानभाडे दामदुपटीने वाढून लुटीचे धोरण अवलंबिले आहे. या भाववाढीचे पडसाद विधानसभेत देखील उमटले.
आमदार दारासिंग यांनी, दरवर्षी आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी आणि अधिवेशन संपण्याच्या दिवशी विमानाचे भाडे २० ते २५ हजार रुपयांपर्यत वाढत असल्याचे सभागृहात सांगितले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू झाले आणि आज बुधवारी त्याची सांगता झाली. त्यानंतर नागपूरहून पुणे आणि मुंबईला आमदार, मंत्री निघाले. या अधिवेशनाच्या निमित्ताने रेल्वेकडून नागपूर आणि मुंबईकडील गाडय़ांसाठी अतिरिक्त डबे देखील लावले जातात. परंतु अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विमान कंपन्यांनी अचानक अडीच-तीन हजार रुपयांचे भाडे चक्क १५ ते २० रुपयांपर्यंत वाढविल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. अधिवेशनाच्या काळात प्रत्येक शुक्रवारी विमानांच्या तिकिटांचे दर वाढवले जात होते. या काळात मंत्री, आमदार आपापल्या मतदारसंघात गेले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २३ डिसेंबरला एअर इंडियाचे नागपूर ते मुंबई भाडे १६ हजार ४५९ रुपये होते. जेट एअरवेजचे नागपूर-मुंबई भाडे १२ हजार ३५८ रुपये होते. गुरुवारी एअर इंडियाचे भाडे १६ हजार ११९ रुपये आहे. तसेच जेट एअरवेजचे नागपूर-मुंबई १६ हजार ६३७ रुपये भाडे करण्यात आले आहे. पुण्याकडे जाणाऱ्या विमानांचे देखील तिकीट दर वाढवण्यात आले आहेत. बुधवारी इंडिगो ६ई – १३७ या विमानाचे भाडे १५ हजार ५० रुपये आकारण्यात आले. एरवी नागपूर ते पुण्याकरिता अडीत ते तीन हजार रुपये भाडे आकारले जाते.

तिकीट महाग आहे तर रेल्वेने जा -मुख्यमंत्री
हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विमानाचे भाडे २० ते २५ हजार रुपयांपर्यंत वाढवले जात असल्याचा मुद्दा मुलुंडचे आमदार दारासिंग यांनी विधानसभेत उपस्थित केला. भाडेवाढ झाल्याने विमानाऐवजी मला रेल्वेचे तिकीट घ्यावे लागले. विमान भाडय़ावर सरकारने नियंत्रण ठेवावे किंवा या कंपन्यांना दरवाढ न करण्याची सूचना करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विमानाचे २५ हजार रुपयांचे तिकीट काढण्यापेक्षा रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले अभिनंदन. यामुळे राज्य सरकारची पैशांची बचत झाली. शिवाय हिवाळी अधिवेशनासाठी रेल्वे अतिरिक्त डब्यांची सोय उपलब्ध करून देत असते. त्याचा सदस्यांनी लाभ घेतला पाहिजे.