अमरावती : सोयाबीन आणि कापूस उत्‍पादकांना क्विंटलवर नाही, तर आम्‍ही हेक्‍टरी मदत देण्‍याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्‍पात ४ हजार कोटी रुपयांची व्‍यवस्‍था करून ठेवली आहे. आम्‍ही शब्‍दाचे पक्‍के आहोत. उद्या मदत मिळाली नाही, तर अजित पवार ‘चले जाव’ असे तुम्‍ही म्‍हणा, विधानसभेच्‍या वेळी उभे करू नका, अशा शब्‍दात उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.

भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक भवनात शिव संभाजी स्‍वराज्‍य प्रतिष्‍ठानच्‍या वतीने आयोजित बहुजन मेळाव्‍यात ते बोलत होते. मेळाव्‍याला भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा, भाजप नेत्‍या चित्रा वाघ, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, रवी राणा आदी उपस्थित होते.

हेही वाचा – जे पी नड्डा म्हणतात, “इंडिया आघाडी म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविणारी… “

अजित पवार म्‍हणाले, सोयाबीन आणि कापूस उत्‍पादक शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक संकटात सापडले. सोयाबीन आणि कापसाची माहिती वेळेत उपलब्‍ध झाली नाही, त्‍यामुळे या शेतकऱ्यांना आचारसंहिता लागू होण्‍याआधी मदत देता येऊ शकली नाही. पण, आम्‍ही अर्थसंकल्‍पात ४ हजार कोटींची व्‍यवस्‍था आधीच करून ठेवली आहे. आम्‍ही शब्‍दाचे पक्‍के आहोत. आम्‍हाला महायुती म्‍हणून विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी पुन्‍हा तुमच्‍याकडे मत मागायला यायचेच आहे. जर मदत मिळाली नाही, तर आम्‍हास दारात उभे करू नका, असे अजित पवार म्‍हणाले.

एकीकडे नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्‍व आहे, तर विरोधकांची खिचडी आहे. नेतृत्‍व देण्‍याची क्षमता कुणाकडे नाही. राहुल गांधी यांच्‍याकडे तर ती क्षमता मुळीच नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. नेतृत्‍व करणाऱ्याला देशातील विविध प्रश्‍नांची जाण असावी लागते. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. पुढे कोणत्‍या गोष्‍टी करायच्‍या, त्‍यांचे नियोजन पक्‍के आहे. दिल्‍लीत मोदींचे सरकार येईल. राज्‍यात आम्‍ही मदत करू. विरोधक काहीही बोलतात. त्‍यांच्‍या घरी आई-बहिणी आहेत की नाही, असा सवाल पवार यांनी केला. मोदी सरकार हे महिलांचा मानसन्‍मान राखणारे आहे, असे ते म्‍हणाले.

हेही वाचा – यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां‍नी दिलेले संविधान जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कायम राहणार आहे. विरोधकांचा केवळ अपप्रचार सुरू आहे. राज्‍यघटनेत दुरूस्‍ती करता येऊ शकते. आजवर सर्व पंतप्रधानांनी १०६ वेळा दुरूस्‍ती केली, असे ते म्‍हणाले. जगात तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्‍यवस्‍था भारत बनणार आहे. या देशाच्‍या विकासात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. केवळ ऊस उत्‍पादक शेतकरीच नव्‍हे, तर धान उत्‍पादकांना आम्‍ही आर्थिक सहाय्य मिळवून दिले. कुठल्‍याही प्रकारचे नैसर्गिक संकट आले, तरी केंद्र आणि राज्‍य सरकारकडून मदत दिले जाते. निकषांच्‍या पलीकडे जाऊन आम्‍ही मदत मिळवून दिली आहे. माझ्या देशातील एकही व्‍यक्‍ती उपाशीपोटी झोपू नये, यासाठी त्‍याला वेळीच अन्‍नधान्‍य मिळावे, अशी व्‍यवस्‍था आम्‍ही केली, असे अजित पवार म्‍हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय खोडके अनुपस्थित

नवनीत राणा यांच्‍या प्रचारार्थ आयोजित मेळाव्‍याला उपमुख्‍यमंत्री अजित पवार उपस्थित असताना त्‍यांच्‍या पक्षाचे नेते संजय खोडके यांची या मेळाव्‍यातील अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली. संजय खोडके हे राणा विरोधक म्‍हणून ओळखले जातात. नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्‍यानंतर महायुतीचे घटक म्‍हणून संजय खोडके हे त्‍यांना पाठिंबा देतील, अशी राणा समर्थकांची अपेक्षा होती, पण संजय खोडके यांनी आपण राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आणि प्रचार फलकांवरील त्‍यांचे छायाचित्र हटविण्‍यास राणा यांना भाग पाडले. अजित पवार हे अमरावतीत असताना देखील संजय खोडके यांनी मेळाव्‍याकडे पाठ फिरविल्‍याने राणा समर्थकांची पुन्‍हा एकदा निराशा झाली आहे.