विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. आमदार भरत गोगावले यांच्या नावाचा उल्लेख करत अजित पवारांनी त्यांचा शपथविधी कधी होणार, शिवलेल्या सुटाला उंदीर लागतील, असं म्हणत खोचक टोला लगावला. तसेच गोगावलेंचा शपथविधी कुठेही असला तरी मी त्याला जाणार असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सांगितल्याचंही त्यांनी म्हटलं. ते मंगळवारी (२७ डिसेंबर) नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “माओवादग्रस्त भागातील विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून १२०० कोटी रुपये मिळावीत आणि कामं मार्गी लागावेत. मिलिटरीच्या धर्तीवर रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी द्यावा. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली माओवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी एक विनंती आहे की, अशा बऱ्याच बैठकांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाऊ शकतात.”

“माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही असं दाखवत नाही”

“माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही असं दाखवत नाही. परंतु, फडणवीस गृहमंत्री आहेत आणि विदर्भातील आहेत. ते मुख्यमंत्र्यांबरोबर गेल्यावर केंद्रात त्या गोष्टी मांडताना सोयीचं होईल. फडणवीस जेव्हा ही गोष्ट बोलतील तेव्हा भाजपाचा एक कट्टर नेता मुद्दा मांडतोय हे दिसल्याने महाराष्ट्राला मदत होईल,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

“गोगावलेंचा शपथविधी जगात कुठेही असला तरी मी त्याला जाणार”

अजित पवार पुढे म्हणाले, “अरे मी चांगलं सांगतोय. गोगावलेंनी शिवून आणलेला सुट कधी घालयचा? काय त्यांना विचारा. मी तर राज्यपालांना सांगून ठेवलंय की, गोगावलेंचा शपथविधी जगात कुठेही असला तरी मी त्याला जाणार आहे. तुम्ही माझं काय अभिनंदन करता, मलाच तुमचं अभिनंदन करायचं आहे.”

हेही वाचा : VIDEO: “एवढं लोकप्रिय गाणं आणि ते विचारतात त्यांनी म्हटलंय का?”, साधना सरगम यांच्यासमोर अजित पवारांची भाजपा आमदारावर टोलेबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“”खूप जणांचे सुट वाया चालले आहेत”

“खूप जणांचे सुट वाया चालले आहेत. त्याला उंदीर लागतील. त्यांना सुटचं काय करायचं कळेना. त्यांच्या घरातील माणसं विचारत आहेत की, कशाला हा सुट शिवला आहे, कधी घालायचा, लग्नात घातला नाही आणि आताही घालत नाही. असं होत असून त्याकडे लक्ष द्यायला हवं,” असं म्हणत पवारांनी खोचक टोले लगावले.