नागपूर: नागपूरसह राज्यभरात आपल्या घर, कार्यालय, रस्त्यावर वीज पुरवठा खंडित होऊन अंधार पसरल्याचे आपण नेहमीच बघत असतो. परंतु नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकाचाच रविवारी गणेशोत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यावर मध्य रेल्वे आणि महावितरणकडून चुकीबाबत एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. त्यातच महावितरणकडून मात्र रेल्वेच्याच चुकीमुळे बिघाड झाल्याचा मोठा दावा केला गेला आहे.
महावितरणच्या दाव्यानुसार, रविवारी (३१ ऑगस्ट २०२५) संध्याकाळी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावर अचानक अंधार पसरल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे स्थानकावर गोंधळ निर्माण झाला. पण लगेचच महावितरणच्या टीमने तात्काळ पावले उचलत अवघ्या तासाभरात वीजपुरवठा पूर्ववत केला. परंतु महावितरणच्या तपासात हा बिघाड रेल्वेच्याच अखत्यारितील उपकेंद्रामुळे झाला आहे. त्यामुळे वीज खंडित होण्याला रेल्वेच जवाबदार आहे. रविवारी संध्याकाळी ५.३७ वाजता अचानक ११ केव्ही अजनी रेल्वे वीज वाहिनीमध्ये बिघाड झाला. तांत्रिक तपासणीत आणि रेल्वेचे खंड अभियंता बाविस्कर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या बाजूकडील पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाले होते. या बिघाडामुळे मेडिकल उपकेंद्राजवळचे दोन खांब बाधित झाले आणि त्यांचे जंपर तुटले. महावितरणला कळताच वीज कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी युद्धपातळीवर काम करून तासभरात संध्याकाळी ६.३२ पर्यंत बिघाड झालेला भाग वेगळा करून पहिल्या टप्प्यातील वीजपुरवठा सुरू केला.
वंजारीनगर उड्डाणपुलाजवळील वीज खांबांवर ठिणग्या…
अजनी रेल्वे स्थानकावरील घटनेनंतर महावितरणकडून अधिक काळजीपोटी रात्री ७.१० च्या सुमारास पुन्हा पाहणी केली असता वंजारीनगर उड्डाणपुलाजवळ दोन खांबांवर ठिणग्या पडत असल्याचे निदर्शनास आले. रेल्वेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आलेल्या बिघाडामुळे जंपर सैल झाल्याने ते झाले. संभाव्य धोका टाळण्यासाठी सैल झालेल्या जंपरला तत्काळ पुन्हा घट्ट करण्यासाठी वीजपुरवठा काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला. त्यानंतर केवळ २५ मिनिटांत, म्हणजेच रात्री ७.३५ पर्यंत, संपूर्ण वीजपुरवठा पूर्ववत केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
महावितरणचे म्हणने काय ?
अजनी स्थानकावर वीज खंडित झालेल्या घटनेचा महावितरणचा दूरान्वयानेही संबंध नाही. त्याबाबत माहिती दिल्यावरही काही माध्यमांनी चुकीचे वृत्तांकन केले. या रेल्वे वाहिनीची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वेकडेच आहे. तरीही, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट समन्वयामुळे वीजपुरवठा वेळेत पूर्ववत करणे शक्य झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि सतर्कता यामुळे मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांना कमीत कमी त्रास झाला. त्यांनी केलेल्या जलद कामामुळेच रेल्वेच्या कामात कोणताही मोठा अडथळा निर्माण झाला नसल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.