अकोला : निसर्गरम्य, हिरव्यागार डोंगरावर चौदावे शक्तिपीठ असलेले जागृत आदिशक्ती माता रुद्रायणी देवीचे दर्शन प्रभू श्रीराम, सीतामाता व लक्ष्मणाने घेतले होते. वनवासात असतांना दोन वेळा त्यांनी रुद्रायणी गड चढून देवीसमोर नतमस्तक झाले होते. जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली परिसरात रुद्रायणी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव सुरू असून दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळत आहे.
निसर्गरम्य वातावरणातील उंच टेकडीवर वसलेल्या रुद्रायणी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची मोठी परंपरा आहे. माता रुद्रायणी देवी शक्तिचे प्रतीक आहे. अकोला शहरापासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेल्या श्री रुद्रायणी देवीचे दर्शन घेण्यासाठी काना-कोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात.
देवीचे मंदिर प्राचीन आहे. अजंठाच्या डोंगराचे शेवटचे ठिकाण हे रुद्र डोंगर असून, या रुद्र नावावरून देवीचे नाव रुद्रायणी म्हणून प्रसिद्ध झाले. यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. मंदिराच्या पायथ्याशी वन विभागाचे पर्यटन क्षेत्र आहे. या मंदिर परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची हिरवी चादर पसरल्याचे मनमोहक व प्रसन्न वातावरण भाविकांना खुणावत असते. रुद्रायणी गडाला ३६० पायऱ्या आहेत. भाविक मोठ्या श्रद्धेने गड चढून देवीचे दर्शन घेतात.
सध्या नवरात्रोत्सव असल्याने मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान स्वयंसेवक व संस्थांच्यावतीने भाविकांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
‘चंद्रविकास’ कमळ अयोध्या व रुद्रायणी गडाच्या पायथ्याशीच
‘रामविजय’ या ग्रंथात व भागवत कथेत रुद्रायणी देवीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता माता हे वनवासात असताना दोन वेळा रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी आल्याचे रामविजय ग्रंथामध्ये पाचव्या अध्यायात १२८ व्या ओवीमध्ये नोंद आहे. मनमोहक पांढऱ्या रंगाच्या कमळाचे फुले वाहून देवीची पूजा, आराधना त्यांनी केली होती. रुद्रायणी गडाच्या पायथ्याशी पायाच्या आकाराच्या तलावाला पद्मा तलाव म्हणून संबोधल्या जाते. या तलावाच्या सभोवताली प्रभू श्रीराम व सीता माता यांनी भ्रमंती केली होती. त्याठिकाणी ‘चंद्रविकास’ कमळ फुले उगवतात. हे कमळ अयोध्या व रुद्रायणी गडाच्या पायथ्याशी असलेल्या तलावातच फक्त रात्रीच्या वेळेस उमलतात, असे सांगितले जाते. ‘चंद्रविकास’ म्हणून ओळख्याल्या जाणारे कमळ आजही येथील तलावात उमलते. भाविक-भक्तांना त्याचे विशेष आकर्षण असते.