अकोला : शासकीय कार्यालयातील लाचखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले असून किरकोळ कामांसाठी देखील लाखो रुपयांची लाच मागितली जाते. शेतीच्या गट क्रमांकामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सव्वा लाख रुपयांची मागणी करून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना बाळापूर तालुक्यात सज्जा हाता भाग-२ येथील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. सतीश सुभाष कराड (वय ३६) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. अकोला व बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बाळापूर तालुक्यातील निंबा फाट्याजवळ संयुक्त ही कारवाई केली. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली.
जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथे तक्रारदाराने २०२४ मध्ये शेती खरेदी केली होती. त्या शेतीचा गट क्रमांक दुरुस्त करून देण्यासाठी तलाठ्याने तक्रारदाराकडे एक लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने २३ सप्टेंबर रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. २४ सप्टेंबरला पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तलाठी कराड याने तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवल्याचे समोर आले. त्यानंतर २९ सप्टेंबरला सापळा रचण्यात आला. यामध्ये तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना आरोपी तलाठ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर आणि भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे, पथकातील प्रवीण बैरागी, अमोल झिने, दीपक जाधव, जगदीश पवार, रणजित व्यवहारे, नितीन शेटे आणि संदीप ताले यांनी ही कारवाई केली.
राज्यात ५२१ लाचखोरीचे प्रकरण
या वर्षांत २४ सप्टेंबरपर्यंत राज्यात लाचखोरीचे ५२१ प्रकरण दाखल झाले आहेत. त्यामध्ये सापळा कारवाई ५१२, अपसंपदा पाच आणि अन्य भ्रष्टाचाराचे चार प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये ७६९ आरोपी आहेत. नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक १०७ गुन्हे दाखल झाले. मुंबईमध्ये ३४, ठाणे ६९, पुणे ८५, नागपूर ४२, अमरावती ५६, छत्रपती संभाजीनगर ८७ व नांदेड परिक्षेत्रात ४१ गुन्हे दाखल झाले आहेत. लाचखोरांवर सापळा कारवाई करून त्यांना अटक करण्यात येत असले तरी लाच मागण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीने नागरिक त्रस्त झाले आहेत.