अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शेगाव मार्गावर एका विहिरीमध्ये तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आरोपीने हत्या करून मृतदेह विहिरीत लटकवत ठेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. पोलीस तपासामध्ये ही हत्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील निरोळा येथील अंकुश श्रीराम सुरडकर (३२) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह बाळापूर-शेगाव मार्गावरील सातरगाव शिवारातील विहिरीत दोरीच्या साहाय्याने लटकवून आत्महत्येचा बनाव केला होता. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह अनोळखी असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ठेवून बाळापूर पोलिसांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर मृतकाची अंकुश सुरडकर रा.निरोळा, ता. संग्रामपूर अशी ओळख पटली.
मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालामध्ये गळा दाबून व डोक्यावर जबर मारहाण करून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. गळा दाबणे आणि डोक्यावरील मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद हिवराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
अकोला जिल्ह्यात हत्येचे सत्र
अकोला जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरूच आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये हत्येचे गुन्हे दाखल झाले आहेत. अकोला शहरात मद्याच्या वादामधून काकानेच पुतण्याला मारून टाकले होते. दगडाने ठेचून ३१ मे रोजी ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २ जून रोजी सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल यांची गुंड प्रवृत्तीच्या महेंद्र पवार याने निर्घृण हत्या केली. अकोट तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाली. पातूर तालुक्यातील विवरा परिसरात १० जूनला एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला. मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात ती हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
मद्य देण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात दोघांनी एकाची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आता बाळापूर तालुक्यात एकाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बाळापूर पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.