अकोला : कुठलीही वैद्यकीय पदवी किंवा रुग्णालयाची नोंदणी नसतांना गंभीर आजारी रुग्णांना दाखल करून बोगस डॉक्टरकडून उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यातील जुने शहर भागात उघडकीस आला आहे. जावेद शेख असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. कंपाऊडर म्हणून त्याने अगोदर काही रुग्णालयात काम केले होते. त्यानंतर त्याने स्वत:च रुग्ण तपासणी व उपचार करण्यास सुरुवात केल्याचा खळबळजनक प्रकार घडला.

जुने शहरातील हरिहर पेठ भागात विना परवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या कथित डॉक्टर विरुद्ध महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आशिष गिऱ्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप चौधरी, डॉ. विजय चव्हाण, डॉ. प्रभाकर मुदगल व जुने शहर पोलिसांनी कथित डॉक्टरच्या रुग्णालयावर छापा टाकला. कथित डॉक्टर जावेद शेख याच्याकडे कोणतीही वैद्यकीय व्यवसायाची पदवी नव्हती. शिवाय रुग्णालय नोंदणी नसताना रुग्ण तपासणी व रुग्ण भरती करून त्यांच्यावर उपचार करतांना आढळून आला. त्याची चौकशी केल्यावर तो कुठलीही पदवी दाखवू शकला नाही. रुग्णालयाला मुंबई नर्सिंग होम ॲक्ट १९४९ अंतर्गत मान्यतेची विचारणा केल्यावर कोणतेही नोंदणी केली नसल्याचे त्याने मान्य केले.

रुग्णालयामध्ये आठ खाटा टाकल्या होत्या. त्यापैकी काही खाटांवर रुग्ण दाखल करून त्यांना सलाईन लावण्यात आली होती. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आणि वैद्यकीय व्यवसायात उपयोगी येणारे यंत्र व उपकरणे आढळून आले. सीलबंद औषधी साठा औषधी विभागाकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आला. कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पदवी नसतांना अवैधरित्या कायद्यांतर्गत नोंदणी नसलेल्या ठिकाणी रुग्ण भरती करून बोगस डॉक्टर उपचार करीत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात फिर्याद डॉ. आशिष गिऱ्हे यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईत अंकुश धुड, पंकज गायकवाड, कुलदीप बारबदे, किरण शिरसाट आदी सहभागी होते. या प्रकरणी ॲड. शुभांगी ठाकरे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोगस डॉक्टरकडून रुग्णांच्या जीवाचा खेळ

बोगस डॉक्टर एका संस्थेच्या वैद्यकीय उपक्रमात देखील सहभागी होता. त्यामध्ये तो रुग्ण तपासणी करीत होता. त्यानंतर त्याने स्वत:च वैद्यकीय व्यवसाय थाटून रुग्णांच्या जीवाचा खेळ चालवला होता. या अगोदर त्याला एकदा समज देऊन सोडण्यात आल्याची माहिती आहे.