अकोला : वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात खोटी तक्रार देण्यास नकार दिल्याने परतवाडा येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी सातत्याने मानसिक त्रास देत असल्याची तक्रार पथ्रोट नियतक्षेत्राच्या वनरक्षक अंकिता मुंडे यांनी अमरावती वनविभाग प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षकांकडे केली. मनस्थिती खालवली असून नैराश्य आल्याने कर्तव्यादरम्यान तणाव वाढत आहे. त्यामुळे तक्रारीची दखल करून न्याय देण्याची मागणी केली.

परतवाडा येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या दर्यापूर वर्तुळातील पथ्रोट नियतक्षेत्रामध्ये वनरक्षक अंकिता मुंडे २० जून २०२३ रोजी रुजू झाल्या. अमरावती वन विभागातील सहाय्यक वनसंरक्षक देसाई व वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एच. वाळके यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे डी.एच. वाळके यांनी सहाय्यक वनसंरक्षकांविरोधात तक्रार देण्यास सांगितले होते.

रोजंदारी मजूर हर्षद पाटणकर याने सुद्धा संपर्क साधून तक्रार केली नाही तर तुमच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे म्हटले. कार्यालयात तक्रार लिहून ठेवण्यात आली होती. ती तक्रार खोटी असल्याने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तेव्हापासून वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एच. वाळके वारंवार त्रास देत असल्याचे अंकिता मुंडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

रात्री-बेरात्री वन्यप्राणी आणण्यासाठी कुठेही पाठवल्या जाते. सोबतीला कर्मचारी दिला जात नाही. शासकीय वाहनात नेहमीच इंधन टाकण्यास सांगितले जाते. त्याचे पैसे दिले जात नाहीत. २ जुलै रोजी अंजनगाव येथे एक पाडस अडकल्याची माहिती मिळाली. त्यावर डी.एच. वाळके यांना माहिती देऊन शासकीय वाहनाची मागणी केली असता त्यांनी इंधन टाकून ते घेऊन जाण्यास सांगितले. त्याला नकार देऊन दुचाकीने घटनास्थळ गाठले. दरम्यान, नागरिकांनी डी.एच. वाळके यांच्याशी संपर्क साधल्यामुळे त्यांनी संतापाच्या भरात माझ्याशी असभ्य भाषेत संवाद साधल्याचा आरोप अंकिता मुंडे यांनी केला.

सहाय्यक वनसंरक्षकांची खोटी तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे आकसापोटी डी.एच. वाळके अपशब्द बोलून विनाकारण मानसिक त्रास देत आहे. कर्तव्य पार पाडतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे तक्रारीचा विचार करून न्याय द्यावा, अन्यथा उद्भवणाऱ्या पेचप्रसंगाला डी.एच. वाळके हे जबाबदार राहतील, असे मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरण संघटनेच्याही अनेक तक्रारी; १५ ऑगस्टपासून आंदोलन

गेल्या दोन वर्षांपासून प्रादेशिक वनविभागात अतोनात वृक्षतोड झाली. वृक्षप्रेमी व आदिवासी पर्यावरण संघटनेने अनेक तक्रारी दिल्या. मात्र, उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्या खोट्या असल्याचे सांगून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले. असंख्य मोठी झाडे तोडली जात असतांना परतवाडा वनपरिक्षेत्रामध्ये कठोर कारवाई झाली नाही. या संदर्भात आदिवासी पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष योगेश खानझोडे व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षकांना निवेदन सादर केले. संबंधितांवर कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.