अकोला : खारपाणपट्ट्यातील गावासाठी नियोजित असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आजपासून (दि. १० एप्रिल) शिवसेनेकडून (ठाकरे गट) टँकरमधील खाऱ्या पाण्यासह अकोला-नागपूर पायदळ मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून ६९ गावांतील खारे पाणी जमा केले जात आहे. उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पाणी पिण्याची आणि त्याच पाण्याने आंघोळ करण्याची विनंती ग्रामस्थ व शिवसैनिक करणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली.

खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्रोत नसल्याने ग्रामस्थांना खारे पाणी प्यावे लागते. ग्रामस्थांना गोड पाण्याची व्यवस्था होण्यासाठी ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. ६९ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले. ४३ कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. त्यापैकी २७ कि.मी. अंतरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. २१९ कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत १२५ कोटींचा खर्च झाला असून, ९२ कोटी रुपये कंत्राटदाराला अदाही करण्यात आले आहेत.

हेही वाचा – व्याघ्र संवर्धनात राज्याची दर्जेदार कामगिरी; देशभरात ३,१६७ वाघांची नोंद, पंतप्रधानांच्या हस्ते अहवाल जाहीर

हेही वाचा – सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर तर, आमची शेतकऱ्यांवर : पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेल्हारा तालुक्यातून या योजनेला विरोध झाला. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह आमदार प्रकाश भारसाकळे यांनी योजनेला स्थगिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. याविरोधात आता वातावरण तापले आहे. या विरोधात आमदार देशमुख यांनी विधिमंडळाच्या परिसरात उपोषण आंदोलनदेखील केले. आता स्थगितीला निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ग्रामस्थांसह अकोला ते नागपूरपर्यंत पायदळ मोर्चा काढण्यात येणार आहे. नागपूरपर्यंत ९ ठिकाणी मुक्काम राहणार आहे. पहिला मुक्काम अंबिकापूर येथे तर शेवटचा मुक्काम १९ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील धामना येथे राहील. त्यानंतर २१ एप्रिलला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवास्थानी मोर्चा पोहोचणार आहे. त्याठिकाणी खारे पाणी फडणवीस यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.