अकोला :अकोला रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेच्या जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमणधारकांनी अवैध ताबा घेतला होता. अतिक्रमणधारकांनी ही जागा अडवून ठेवल्याने रेल्वेला विविध अडचणींचा सामना करावा लागला. या अतिक्रमणधारकांविरोधात मध्य रेल्वे प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अकोला रेल्वेस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली.अकोला येथील गौतमवाडी,आपतापा मार्ग आणि चिखलपुरा,खराप मार्ग या भागांत सुमारे ८६ अतिक्रमण हटवून जवळपास ४० हजार चौ.मी. क्षेत्रफळाचे रेल्वेची जमीन मुक्त करण्यात आली. या जमिनीची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे.

रेल्वेची विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत येणारे अकोला हे अत्यंत महत्त्वपूर्ण व जंक्शन रेल्वेस्थानक आहे. अकोल्यात रेल्वेस्थानक परिसराची व्याप्ती विस्तीर्ण आहे. रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या संपूर्ण जमिनीचा वापर पूर्णपणे होत नाही. त्यामुळे पडीक जमिनीवर अतिक्रमण थाटण्यात आले होते. गेल्या २५ वर्षांपासून हे अतिक्रमण कायम होते. वारंवार सूचना व नोटीस बजावून देखील अतिक्रमणधारकांनी रेल्वेच्या जमिनीवरील आपले अतिक्रमण हटवले नव्हते. अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारला.

मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमणधारकांचे ८६ अतिक्रमण जेसीबीच्या मदतीने काढण्यात आले. यावेळी काही अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध देखील केला. ही कारवाई रेल्वे अभियांत्रिकी विभाग व रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पार पडली. तसेच अकोला शहर पोलीस दल आणि महावितरण यांचे या कारवाईस मोलाचे सहकार्य लाभले. गेल्या २५ वर्षांपासून अतिक्रमित असलेली ही जमीन आता पूर्णपणे रेल्वेच्या ताब्यात आली आहे. रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करू नये, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेच्या विविध योजना राबविण्यास मार्ग मोकळा

रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण भुईसपाट केल्यामुळे रेल्वेच्या विकास कार्यासाठी जमीन उपलब्ध झाली आहे. जमीन अतिक्रमण मुक्त करण्याची ही कारवाई रेल्वेच्या भविष्यातील विविध पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे अकोला परिसरात रेल्वेच्या विविध योजना राबविण्यास मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा निर्माण निर्माण होणार असल्याने त्यांना दिलासा मिळेल.