अकोला : ‘घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…’, ‘नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…’, ‘कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…’ अशा असंख्य व्यथा, वेदना, तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना ‘एल्डर लाईन’ हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडता येणार आहे.
ज्येष्ठांना मदतीसाठी ‘१४५६७’ ही ‘एल्डर हेल्पलाइन’ सुरू करण्यात आली. गरजूंना त्याचा मोठा लाभ होईल. ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उतार वयात ज्येष्ठांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी पुणे उपलब्ध होत नाहीत.
ज्येष्ठांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ज्येष्ठांसाठी ‘एल्डर हेल्पलाइन’ सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशासीत प्रदेशात सुरू करण्यात आली आहे.
पुणे येथील जनसेवा फाउंडेशन यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. “मानवसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य घेऊन जनसेवा फाउंडेशन गेली ३७ वर्षापासून सातत्याने विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, गरीब मुले-मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाउंडेशनला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.
३० हजारांवर प्रकरणात क्षेत्रीय पातळीवर मदत
१४५६७ राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून, ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे. हेल्पलाइनद्वारे आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर याची माहिती प्राप्त होईल. कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ यावर देखील मार्गदर्शन केले जाणार आहे. मानसिक आजार व चिंता, ताण, राग आदींचे व्यवस्थापन करून भावनिक आधार दिला जाईल. बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न, पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन केले जाणार आहे.
विश्वासाचा सुरक्षित आधार
‘एल्डर लाईन १४५६७’ ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल. यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. सर्व गरजू वयोवृद्धांनी या ‘एल्डर लाईन’चा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.