अकोला : पंढरपूर-अकोट एसटी बस चालक व वाहकाने मद्यधुंद अवस्थेत चालवल्याचा धक्कादायक प्रकार प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बीड जिल्ह्यात उघडकीस आला होता. या प्रकरणी बीड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. आता एसटी विभागाने देखील कठोर पावले उचलली आहेत. मद्यप्राशन करून बस चालवणाऱ्या चालक आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. मद्यधुंद अवस्थेत चालक व वाहकाने बस चालवण्याच्या बेपर्वाईमुळे तब्बल ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.
वारकऱ्यांना पंढरीची वारी घडण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून विशेष नियोजन केले जाते. राज्यभरातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या सोडण्यात येतात. अकोला जिल्ह्यातून सुद्धा पंढरपूर यात्रेसाठी नियोजन करण्यात आले होते. अकोट आगाराची एमएच-१४ – ६१४० क्रमांकाची बस पंढरपूरला वारकऱ्यांना घेऊन गेली होती. मात्र, ही बस परत येत असतांना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३७ प्रवाशांच्या जीवावर हा प्रवास उठला होता.
पंढरपूरवरून वारकऱ्यांना घेऊन बस अकोटकडे परत येण्यासाठी दुपारी ४ वाजता निघाली होती. चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे दोघे बसमध्ये कर्तव्यावर होते. बसमध्ये ३७ प्रवासी प्रवास करीत होते. त्यात महिला, पुरुष तसेच दोन लहान मुलांचा देखील समावेश होता. बीड-अंबड मार्गावर चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय प्रवाशांना आला. दोघांचीही वागणूक विचित्र होती. दारूच्या नशेत वाहक अक्षरश: बसमध्ये खाली पडला होता, तर चालकाला देखील बस चालवणे अत्यंत अवघड जात होते. प्रवाशांनी दोघांना हटकले. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
अखेर प्रवाशांनी एसटी प्रशासन व पोलिसांशी संपर्क साधला. काही प्रवाशांनी आपल्या नातेवाईकांना देखील या प्रकाराची माहिती दिली. बीड पोलिसांनी याची तत्काळ दखल घेतली. एसटी बस थांबवून मद्यधुंद अवस्थेतील चालक व वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एसटी प्रशासनाने दुसरे चालक व वाहक पाठवून बस पुढील प्रवासासाठी रवाना केली. दरम्यान, या प्रकरणात एसटी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
अकोट आगारातील चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झालटे यांनी मद्यप्राशन करून बस चालवल्या प्रकरणी अकोला विभाग नियंत्रकाकडून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्या चालक व वाहकाची चौकशी सुरू आहे. चौकशी अहवालात आरोप सिद्ध झाल्यास दोघांवरही बडतर्फीच्या कारवाईची टांगती तलवार आहे.