अकोला : हिवाळ्यामध्ये दिवस लहान, तर रात्र मोठी असते. २२ डिसेंबर हा वर्षांतील सर्वात लहान दिवस राहणार आहे. या दिवशी सव्वा तेरा तासांची रात्र, पावणे अकरा तासांचा दिवस राहील, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रभाकर दोड यांनी दिली. दिवस व रात्रीचा कालावधी कमी-अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या २३.५ अंशांनी कललेला असल्याने हे घडते. २१ मार्च किंवा २३ सप्टेंबर या विषुवदिनी सूर्य निश्चित पूर्वेस असतो. २२ डिसेंबर या अयनदिनी सूर्य अधिकाधिक दक्षिणेकडे असून या वेळी उत्तर गोलार्धात दिनमान सर्वात कमी अर्थात दिवस सर्वात लहान असतो. येथून पुढे सूर्य उत्तर बाजूस सरकत जातो, यालाच उत्तरायण म्हणतात. ही स्थिती २१ जूनला पूर्ण होते, हा दिवस आपल्या भागात सर्वात मोठा असतो.
हेही वाचा : “…म्हणून विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून घोषणा”, पोहरेंनी स्पष्टच सांगितलं
२२ डिसेंबर रोजी सूर्य नेमका पृथ्वीच्या मकर वृत्तावर असून अक्षवृत्तीय स्थितीनुसार उत्तर बाजूस दिनमान वाढत जातो. उत्तर ध्रुवावर ते सर्वाधिक असते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या संपातदिनी दिवस रात्र समान असतात, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले. २२ डिसेंबर या अयनदिनी अकोला येथील सूर्योदय सकाळी ६.५६ वाजता, तर सूर्यास्त ५.४४ वाजता होईल. सुमारे पावणे अकरा तासाचा दिवस, तर सव्वा तेरा तासांची रात्र राहील. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन दिनमान वाढत जातो. यातील फरक मात्र मकर संक्रांतीला जाणवतो, असे प्रभाकर दोड म्हणाले.
हेही वाचा : बालके अनौपचारिक शिक्षण, पोषण आहारला महिनाभर मुकणार; सरकार-कर्मचारी संघटनांची चर्चा फिस्कटली
ग्रह ताऱ्यांच्या दर्शनाची उत्तम संधी
२२ डिसेंबरची रात्र सर्वात मोठी असल्याने ग्रह ताऱ्यांच्या दर्शनाची उत्तम संधी असेल. रात्रीच्या प्रारंभी पूर्वेकडे वर चंद्र आणि सर्वात मोठा गुरु ग्रह एकमेकांच्या जवळ, आणि याच वेळी दक्षिण आकाशात वरच्या बाजूला शनी ग्रह आणि पहाटे पूर्वेला शूक्र ग्रहाचे ठळक स्वरूपात दर्शन होईल. खगोलप्रेमींनी याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.