लोकसत्ता टीम

अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसने गुरुवारी रात्री उशिरा साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली. साजिद खान पठाण यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. काँग्रेसने विश्वास दाखवलेल्या साजिद खान पठाण यांची पार्श्वभूमी जाणून घेऊया.

साजिद खान पठाण सर्वप्रथम २००७ मध्ये अकोला महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनदा ते महापालिकेचे सदस्य होते. या काळात स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांची वर्णी लागली होती. त्यावेळी त्यांनी स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचे नाव दिले होते. त्यावरून वाद देखील निर्माण झाला होता. त्यानंतर अकोला महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी कामकाज केले.

आणखी वाचा- ‘एसटी बँक’ अडचणीत! सभासदांच्या कर्ज पुरवठ्याला स्थगिती, कारण काय? वाचा…

२०१९ च्या निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत साजिद खान पठाण यांनी दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना तुल्यबळ लढत दिली होती शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज साजीद खान यांनी शर्मा दिली होती. मतमोजणीमध्ये सुरुवातीला त्यांनी आघाडी सुद्धा घेतली होती. या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांना ७३ हजार २६२, तर साजिद खान पठाण यांना ७० हजार ६६९ मते मिळाली होती.

दोन हजार ५९३ मतांनी साजिद खान पठाण यांचा पराभव झाला होता. आता पठाण पोटनिवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरणार आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे साजिद खान पठाण यांच्यावर दाखल आहेत. आता पोटनिवडणुकीमध्ये त्यांची रणनीती काय राहणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.